Tuesday, 1 November 2011

अलविदा ना कहना ... !


            प्रवास ... हा शब्द आपल्या आयुष्यात अपरिहार्य बनलेला आहे. कोण पोटासाठी तर कोणी मौजेसाठी पण प्रवास अटळ आहे. दिवाळी संपल्यावर.. औरंगाबाद सोडलं आणि पुन्हा प्रवास सुरु झाला. प्रवासात मी कार चालवताना बाजूला चित्र अनेक प्रवाशांचं दिसत होतं. सगळेच आपापली दिवाळी आटोपून आपापल्या नोकरीच्या ठिकाणी निघालेले. मनही मग प्रवासाच्या विचारात गुंतलं.
     आयुष्य हा देखील एक प्रवासच आहे. पहिल्या श्वासापासून शेवटच्या श्वासापर्यंतचा. या प्रवासात सारेच व्यस्त आहेत पण त्याचा हेतू किती जणांना कळला आहे असा प्रश्न पडतो. या प्रवासात प्रत्येकाला वेगळं जग जगायचं असतं.
     प्रवास हा शब्द समोर आल्यावर मला डोळ्यासमोर मुंबईत सी.एस.टी.च्या बाहेर पडणारी गर्दी दिसत असते. ही सारी जनता आपल्या स्वत:च्या आणि कुटुंबाच्या पोटासाठी दररोज न चुकता प्रवास करतात. त्यातून त्यांची एक प्रवासी मानसिकता तयार झालेली दिसते. गर्दीत लोंबकळत प्रवास करणं प्रारंभी मजबूरी असते नंतर ती सवय होवून जाते.
     प्रवास... दर्यावर्दी वेगळा प्रवास करीत कोलंबस सारख्या दर्यावर्दी नव्या जमिनीच्या शोधात प्रवास करायचा. लहानपणी गोष्टी वाचल्या होत्या त्या सिंदबादच्या सात सफरींची तो प्रवास असो की हातीमताईचा चमत्कारी शाब्दीक कोडे पूर्ण करण्याचा प्रवास... सारं रोमहर्षक असच होतं.
     अलेक्झांडर असो की नेपोलियन सा-यांनाच जगाच्या साम्राज्यपदाचं वेड त्यातून त्यांचा घडलेला प्रवास हा इतिहासच आहे. मोहनदास करमचंद गांधी यांच्यातील बापू जागा झाला तो दक्षिण आफिकेत प्रवास करताना झालेल्या अपमानातूनच आपल्या कोणत्या प्रवासात माझ्यातला मी मला सापडणार असा प्रश्न माझ्या मनात तरळत असतो.
     प्रभू श्रीरामचंद्रांनी 14 वर्षे वनवासाचा प्रवास केला त्यात पत्नी या नात्यानं सितेने साथ दिली हे कळतं पण लक्ष्मणाने दिलेली साथ अतुलनीय अशीच होती. असा लक्ष्मण आजच्या प्रवासात भेटत नाही हे देखील कबूल करावच लागतं.

     प्रवास  आणि त्याचे पर्याय अर्थात प्रवास कसा होतो. कधी पायपीट कधी सायकल नंतर मग मोटारसायकल. काही प्रसंगात हा प्रवास रिक्षा किंवा बसच्या रुपाने करता येतो तर रेल्वेचा प्रवास ही अजब कहाणी ठरते. मध्यमवर्गीयांचे स्वप्न असणारा हवाई प्रवास हल्ली स्वस्त विमानसेवांमुळे आवाक्यात येत आहे. सागरी प्रवास प्रत्येकाला हवा वाटतो पण ते शक्य नसतं यात एक प्रवास सा-यांनाच अटळ तो अर्थात मरणानंतरचा पण तिथं आपणच नसतो तो प्रवास इतरांनी घडवयाचा असतो.
     प्रवास आणि त्याचं वर्णन आणि त्यावर उभा असलेला पर्यटनाचा व्यवसाय लाखोंना यातून रोजगार मिळतो लाखो कुटुंबांचं भरण पोषण यावरच होतो. त्यात बसस्थानक- रेल्वेस्टेशनवर ते फेरीवालेही आले.
     चला जाता हूं किसी की धून में....
असं म्हणत सुरु झालेला प्रवास कधी सांगायचं
     आदमी मुसाफिर है !
अशी अनेक गाणी त्याच्यावरची सापडतील आणि या प्रवासात एकदा भेटलेली व्यक्ती पुन्हा भेटेलच याची खात्री असत नाही जग कालच 700 कोटींचे झालय. तरी देखील आशा ठेवायची की अशी व्यक्ती पुन्हा कधी ना कधी भेटेल आणि मनाला बजावायचं.
     चलते चलते मेरे ये गीत याद रखना
     कभी अलविदा ना कहना .....
अशा प्रवासाला निघालेल्या तुम्हा सर्वांना शुभेच्छा... सायोनारा.
-          प्रशांत दैठणकर

No comments: