Friday 11 November 2011

हिरव्या पानाचा देठ की हो...



     कशाचं मुल्य काय असतं हे फक्त श्रीमंतांना कळतं मात्र कशाची किंमत काय असते ही केवळ आणि केवळ मध्यमवर्गीयाला आणि गरीबांना कळतं असं महणावं लागतं.
     काही बाबी नजरेसमोर आल्यावर विचारांना त्या आपोआप चालना देतात आणि आपण विचार करायला लागतो. संध्याकाळी जेवण करुन तारावर पान खाताना असंच माझं झालं. अरे हो तारा म्हणजे औरंगाबाद शहरातील उस्मानपुरा भागात असणारं तारा पान सेंटर. आपण साधारण पानटप-या किंवा पानाचे ठेले बघतो मात्र काही बाबतीत औरंगाबाद शहर आजही नबाबी थाटाचं आहे. माणसं शौकीन आहेत आणि त्त्यांची पानाची आवड पुरविणारं हे पान सेंटर म्हणजे पानाचा भला मोठा कारखानाच आहे.
     लांबलचक हजार चौरस फुटांचा व्याप आणि त्यात एकावेळी काम करणारे किमान 70 ते 80 जण असा ताफा. इथं शौकीन येत राहतात आणि पानाची फॅक्टरी सुरुच राहते. गुटखा आल्यावर पानाची विक्री कमी झाली अशी ओरड सर्व पान टपरीवाले करतील मात्र या ठिकाणचं चित्र निराळच आहे.
     रात्री आठनंतर हा भाग फुलायला लागतो. जुन्या उस्मानपु-यातील त्या तंग गल्लीत गाड्यांच्या रांगा लागायला सुरुवात होते. गाडीत कुटुंबासह आलेली मंडळी गाडीत बसूनच पान खाणं पसंत करतात आणि सेवाही अगदी कारमध्ये पुरविली जाते. पार्कींग सांभाळण्यासाठी 3 जण राबताना इथ दिसतील.
     ओरंगाबादेत अगदी राष्ट्रपती आले तरी तारा पान चं पान जेवणानंतर देण्याची परंपरा आहे. आणि त्यामुळेच याचे मालक शरफुद्दीन ज्यांना सारं शहर शरफुभाई म्हणून ओळखतं, त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळाली आहे. प्रचंड पैसा येवूनही यश आणि पैसा डोक्यात न जाऊ देता शरफूभाई मान खाली घालून सकाळ-संध्याकाळ व्यवसाय सांभाळतात. शरफूभाईंची पानं मुंबई आणि दुबईपर्यंत जातात. त्यांच्या मेहनतीचं फळ म्हणजे `तारा` औरंगाबादच्या महत्वाच्या ठिकाणांपैकी एक ठिकाण बनलय.
     खाणारे हौशी आणि हौसेला मोल नसतं या उक्तीप्रमाणं इथं पानाचे खवय्ये... खईके पान बनारसवाला म्हणत तोंड रंगवत असतात. पान खाणे आणि पार्सल घरी नेणे हा माझा नित्याचा उपक्रम आहे त्यामुळे शरफुभाईंची रोजी भेट. याच ठिकाणी मध्यरात्रीच्या गमतीजमती आगळ्याच नाटकाच्या प्रयोगाला आलेल्या विजय कदमला सारंग नावाच्या मित्रानं पान खायला इथं आणलं. याला कुठतरी पाहिलय अशी आसपास कुजबूज पण विचारायला कुणी पुढं आलं नाही.
     एका रात्री ड्युटीवरुन परतताना याच ठिकाणी सुदेश भोसलेची झालेली भेट आणि त्याने सादर केलेली एक तासाची मिमिक्री आयुष्याची आठवण याला प्रेक्षक आम्ही तीनच  मी, बाबा गाडे आणि जयप्रकाश दगडे.
     असं सारं नजरेसमोर येण्याचं कारण अर्थात तिथं लावलेला दरफलक मसाला कलकत्ता पान 10 रुपयांपासून आणि अधिकात अधिक किंमत किती असावी तर 3000 रुपये हा चक्क 3000 रुपये. ज्या रकमेत गरीबाचं घर महिनाभर चालतं त्या रकमेचं पान अन् विडंबना ही की   शेवटी  पान खाऊन थुंकायचच ना .... ते देखील विकतच ना ....!काही गोष्टी मनाला कायम टोचत राहतात त्यापेकीच हे 3000 रुपयाचं पान. चालायचच आपला देश असा विषम समाजाचा आहे. आणि विचारांच्या  नादात त्या दिवशीचं पान रंगलच नाही असं मनाला उगाच वाटत राहीलं.
प्रशांत दैठणकर

No comments: