Monday 7 November 2011

कलईची भुरळही


तो एक जादुगार वाटायचा लहानपणी. घराघरात त्याची वाट बघितली जाते अशी स्थिती होती. लहानपणी त्याचे ते पाठीवरचे दुकान अंगणात लावायचा त्यावेळी आमच्यासाठी ती मनोरंजन होतं खूप मोठं. ते सारं काही वेगळं अनुभव देणारं आणि चमत्कारीकच होतं. तो होता कलईवाला. भांड्यांना कलई केली जायची कारण तांबे आणि पितळेची भांडी त्यावेळी मोठ्या प्रमाणात वापरात होती.
साधारणपणे तांब्याच्या भांड्यात आंबट पदार्थ ठेवता येत नाहीत. या धातूची आंबट पदार्थावर रासायनिक प्रतिक्रिया होते आणि पदार्थ विषारी बनतात. असे पदार्थ खाणं घातक आहे म्हणून भांड्यांना कलई करणं आवश्यक असायचं. याचसाठी हा कलईवाला गरजेचा होता.
तो गल्लीत आरोळी ठोकायचा ए कलईवाला... मग कुठल्या ना कुठल्या बि-हाडातून त्याला आवाज दिला जायचा... मग त्याचं दुकान सुरु. सायकलवरुन छोटा भाता काढायचा. जमिनीत छोटासा खड्डा करीत तो भाता तिरका लावायचा आणि समोरच्या खड्ड्यात कोळसे ओतायचे. तोवर आसपासच्या घरांमधून दराबाबत घासाघिस झाल्यावर भांडी आणली जायची.
त्यानंतर भात्याने कोळशाचे निखारे फुलवले जायचे. ताजा रेफरंस असल्याने खरे शोले बघण्याचा आनंद आमच्या चेह-यावर असायचा. बच्चे कंपनी त्या कलईवाल्याला गराडा घालून बसायचो. तो सराईत जादुगाराप्रमाणे भांड निखा-यावर ठेवून गरम करायचा. त्याच्या खास चिमट्यानं धरीत त्यात नवसागर टाकुन कापडाने आत हात घालून फिरवायचा त्यावेळी पितळी भांड्याचा पिवळा रंग मिटला जाउन सुंदरसा रूपेरी रंग आणि लकाकी त्या भांड्याला यायची.. ही सारी जादुच वाटे. नंतर ते गरम भांडे पाण्याच्या बकेटमध्ये टाकल्यावर त्याचा खास होणारा चर्र... आवाज आजही कानात ताजाच वाटतो.
काळ बदलला आणि स्टेनलेसचा चकचकीतपणा घराघरात आला. आता तो बिचारा कलईवाला कोणता व्यवसाय करीत असेल असा सवाल आज माझ्या मनाला कायम पडतो आणि त्या वयातली ती कलईची भुरळही जाणवत रहाते.
प्रशांत दैठणकर
छायाचित्रे मायबोलीवरून साभार

No comments: