Sunday, 20 November 2011

आयटम है हम दोनो..

कलाकार कसा मनस्वी आणि आपल्यातच जगत असतो याचं उत्तम चित्र रॉकस्टारच्या रुपानं बघायला मिळालं आणि मी एका वेगळ्याच विचारानं वेगळ्या विश्वात निघालो. आजकालचा जमाना हेवी पेरेंटींगचा जमाना आहे. यात आपण कलाकार घडला जावा हा प्रयत्न मुलांबाबत करीत असतो. त्यापाय़ी त्या बिचा-यांना आपण खुप बाबीत एकाच वेळी गुंतवतो.
माझा मुलगा सिंगर झाला पाहिजे, मुलगी डान्सर झाली पाहिजे असं आपल्याला वाटतं आणि आपण मुलांना आपल्या आवडीच्या क्षेत्रात ढकलतो. मुलांचा कल कशात आहे हे जाणुन घेणारे काही पालक आहेत पण त्यांचे प्रमाण खुप कमी आहे. 
प्रत्येक जण कलंदर असत नाही. तसं असतं तर त्यांच्या कलंदरपणाचं कौतुकही झालं नसतं. काही जण कलंदर आणि आपल्यातच मग्न राहणारे असतात.
रणवीरनं त्यात उभा केलेला जॉर्डन खरच खुप काही आठवणी जाग्या करणारा होता असं म्हणता येईल. कधी काळी आपणही हा कैफ जगला होता असं प्रत्येकाला आत्मसंवादात जाणवेल. धकाधकीच्या या काळात नोकरी हेच ध्येय्य मानत आपल्यापैकी अनेकांनी आपल्यातील जेजेच पुढे नेला आणि त्यामुळेच आपल्यातील ज़ॉर्डन आतच राहून गेला असं वाटून जाईल इतकं नक्की.
बंदीस्त आयुष्याची आपणास सवय झालेली असते. हेच सुरक्षित आहे असं आपण मानतो आणि पुढच्या पिढीलाही त्याच मार्गावर नेतो असं मला जाणवायला लागलय हल्ली. जगण्यात असणारा खरा आनंद कधीच मिळवत नाही आणि खरं जग आपण बघतच नाही आपण आपल्याच जगाला मोठं मानतो. बिनधास्तपणा प्रत्येक नव्या जीवात असतो. आपणच त्याच्या मनात आपलं जग मोठं हे बिंबवतो हेच खरं.
चित्रपटात एक संवाद आहे.. हम दोनो आयटम है.. मनस्वीपणासाठी वापरलेला शब्द मनाला खुप भावला. आजच्या पिढीची भाषा वेगळी. त्यांचे शब्दही वेगळे.. पण हा आयटम थेट मनाला भिडला. आपणही कधी असेच जगायचं ठरवलं आणि आज मात्र वेगळ्या मार्गावर आहोत हे देखील लक्षात आलं. तारूण्यातली धुंदी आणि तो बेधडकपणा व बिनधास्तपणा पुन्हा मनासमोर आलं आणि मन नव्याने तरूण झालं असं म्हणायला हरकत नाही. शरीराचं वय वाढतच जाणार आहे मन मात्र तरूण ठेवता येतं आणि ते ठेवायलाच पाहिजे.
प्रशांत दैठणकर

No comments: