Friday, 18 November 2011

झिरो फीगर


 काही शब्‍द गंमत करणारे असतात तर काही व्‍याख्‍या गंमत करतात. नव्‍याने भाषेचा परिचय झालेल्‍या व्‍यक्‍ती नेमकेपणानं शब्‍द मांडून सांगू शकत नाही. तर काही व्‍यक्‍तींची विचार करण्‍याची पध्‍दत वेगळी असते आणि यातून काही खुमासदार किस्‍से तयार होतात. काही गंमती, विनोद घडतात आणि अशा किश्‍शांनी  आयुष्‍याच्‍या प्रवासाला अनोखी रंगत येत असते.
VEDANT... Look the naughty eyes
     माझा मुलगा चिरंजीव वेदांत अर्थात घरातलं चैतन्‍य. काही तरी आऊट ऑफ कॅनव्‍हास पध्‍दतीने तो विचार करतो आणि बोलत असतो. त्‍यानं लावलेली व्‍याख्‍या ऐकूण धमालच झाली. टि.व्‍ही. वर कुठलासा शो चालू होता. त्‍यात विषय आला करिना कपूरच्‍या झिरो फिगरचा याला ऐकता ऐकता सूचलं आणि नंतर सगळे जण खो-खो हसत राहीले.
     आई, झिरो म्‍हणजे गोल असतो मग गोल आकार असलेल्‍या हिरोईनला झिरो फिगर म्‍हटलं पाहिजे करिना तर गोल नाही .. झालं आता वेदांतने केलेली ही व्‍याख्‍या लावायची ठरवलं तर चाळीशी गाठणा-या बहुतांश व्‍यक्‍ती झिरो फिगरच्‍या म्‍हणाव्‍या लागतील. लठ्ठपणा आहे म्‍हणून न लाजता अभिमानानं सांगता येईल. आम्‍ही कसे झिरो फिगर वाले. तुमच्‍या सारखे काडी फिगर नाही. ही व्‍याख्‍या  लावल्‍यास  लठ्ठपणामुळे चिंतेत जगणारे चिंतामुक्‍त होतील. अशी गंमत असते या चिमखड्या बोलांची.
     अशी वेदांतच्‍या व्‍याख्‍येतली झिरो फिगर गाठणं आणि ती मेंटेन करणं अगदी सहज शक्‍य आहे. यालाच मी आऊट ऑफ कॅनव्‍हास विचार करणं म्‍हणतो.
 मिश्‍कीली करायला जमणं आणि ती उपजत असणं यात खूप मोठा फरक आहे. यावरुन आठवलेला एक किस्‍सा औरंगाबादला पत्रकारांच्‍या बैठकीनंतर पार्टी सुरु होती. त्‍यावेळी नागपूर विभागाचे संचालक असलेले आमचे शरद चौधरी हे देखील बैठकीला आले होते. त्‍यांच्‍या स्‍वभावातच मिश्‍कीलपणा आहे.
     पार्टीत आमच्‍या कार्यालयाचे सर्व कर्मचारी लगबग करीत होते. शरद चौधरींनी कोल्‍ड्रींकबाबत विचारणा केली तिथं सलीम हा निवृत्‍तीकडे झुकलेला आमचा ऊर्दू अनुवादक उभा होता. साहेबांनी कोल्‍ड्रींक मागितलय म्‍हटल्‍या वर तो धावत बाहेर गेला. तो परत आला त्‍यावेळी त्‍याच्‍या  हातात अख्‍खा कोल्‍ड्रींकचा क्रेट होता. वजनाने वाकलेल्‍या सलीमला शरद चौधरी लगेच म्‍हणाले ओ सलिम थोडा और लाते... त्‍यांच्‍या या वाक्‍याने सलिम गोंधळला... क्‍या  असा प्रश्‍नांकीत शब्‍द त्‍याच्‍या  तोंडून  बाहेर पडला. आमचीही अशीच प्रतिक्रिया होती. थोडा और लाते तो मै नहा लेता असं शरद चौधरींनी म्‍हटल्‍यावर अख्‍ख्‍या हॉलमध्‍ये सगळे खळखळून हसले.
हसणे आणि हसविणे शब्‍दांचाच खेळ आणि चपखलपणाने जमलेला शब्‍दांचा मेळ असतो. अशा मिश्‍कीलबाजांना मनापासून सलाम.
-         प्रशांत दैठणकर

No comments: