Thursday 25 August 2011

कडाकडी की मजा बडी ... !

          झोळी करुन त्याला बांधलेला डबा आणि त्याचा तो टिपिकल आवाज `कडाकडी की मजा बडी ` .... ! `   त्यावेळी औरंगाबादच्या रस्त्यावर फिरणारं ते ध्यान. त्याचं नाव माहिती नाही पण तो कडाकडी वाला आमच्या रोजच्या आयुष्याचा भाग होता .... दिवस अर्थात 1980 च्या आसपासचे.

                               
     कडाकडी म्हणजे काय आता आठवत नसलं तरी त्याची चव आजही स्मरणात आहे. साखरेपासून विविधरंगी लवचिक धाग्यासारख्या त्या पदार्थाचं नाव कडाकडी. ती कडाकडी जिभेला गोड लागणारी आणि लहानपणी आपण सगळेच ` गोडघाशे `
          त्या डब्यातून तो त्या कडाकडीची तार लांबलचक ओढायचा आणि तेथुन त्याला वेटोळे घालत फिरवत त्याची एक चकती होईल असं बघायचा. ती चकती डाव्या हातावर घेऊन त्यावर उजव्या हाताची चापट मारली की कडाकडी रेडी टू डिलीव्हर .... ( आजच्या भाषेत याला लॉलीपॉप म्हणता येईल ).. मग आपणही ती सुटी करत तार ओढत खायची.... किंमत खूप झाली ... फक्त दहा पैसे हो फक्त दहा पैसे.
     काळाच्या ओघात तो कडाकडीवाला कुठं हरवला ते आठवत नाही. मात्र त्याची ती विक्री करण्याची ` स्टाईल ` आजच्या एमबीएच्या मुलांनी बघायला हवी होती असं वाटतं.
     छोट्याशा बाहुलीचं तोंड अंगठ्यात अडकवून त्याची स्टोरी सुरु व्हायची.

              कडाकडी की मजा बडी
              कडाकडी की मजा बडी
              जो भी खायेगा खुश हो जायेगा
              जो नही खायेगा वो पछतायेगा
              कडाकडी की मजा बडी

      मग त्याचं बाहुली नाट्य सुरु व्हायचं                          
             .... ही कोण ?
            .... हिचं नाव हाय  शिला
                लगीन करायचय हिला .... !
          अर्थात बाल गोपालांना जमवून आणि खिळवून ठेवण्यात तो वाकबगार होता यात संशयच नाही.
             कडा कडी की मजा बडी
              ही खाऊन राहिली अन्
              ती पाहून राहिली .... !

      
           तो आता असेल नसेल याची माहिती नाही पण औरंगाबादच्या गल्ल्यांमध्ये ज्यांचं बालपण गेलयं त्या सा-यांच्या मनात मात्र तो कडाकडी वाला कायम घर करुन राहिलेला आहे हे नक्की. आजही अपार्टमेंट समोरच्या रस्त्यावरुन जाणारा एखादा कुल्फीवाला घंटी वाजवतो त्यावेळी लहानपणचा तो कडाकडीवाला आठवतो. कधी तरी माझ्या मुलांनाही मला दाखवता येईल की कडाकडी काय असते... आणि जोरात आवाज येईल.

              हे ... कडाकडी की मजा बडी ... !


                                                                             प्रशांत दैठणकर
                        0000

No comments: