Tuesday, 30 August 2011

रस्त्यावरचा सिनेमा ...!          गणेशोत्सव हा आमच्यासाठी ख-या अर्थानं स्वर्णीम काळ असायचा वर्षातला. सातव्या-आठव्या वर्गात असताना कळायचं तसं किती, मात्र खरा आनंद ज्याला निर्भेळ आनंद म्हणता येईल असा आनंद त्याच वयात आणि गणेशोत्सवातच मिळायचा.
     सराफा बाजारचा गणपती शहरातला सर्वात श्रीमंत गणपती मात्र त्यावेळी त्या श्रीमंतीचं फारसं कौतुक नसायचं त्यावेळी शहर इतकं पसरलं नवहतं. सकाही आवर्जून मराठवाडा लोकविजय, अजिंठा आणि लोकमत बघायचा कारण आकर्षण होतं सिनेमाचं. समर्थनगर असो की स्नेहनगर कुठं आज सिनेमा आहे याची माहिती काढून ठेवायची.
     विश्‍वास नगर, नवीन वाटतं का नाव ?  हो विश्‍वास नगर , विश्‍वास पानीपतावर गेला तसा या भागाचं नावही गेलं. विश्‍वास नगर म्हणजे लेबर कॉलनी होय. त्याच प्रमाणे कोटला कॉलनी या शासकीय कर्मचा-यांच्या वसाहती, इथं आवर्जून सिनेमा दाखवला जायचा.
     मोठ्या पटांगणात बांधलेला पडदा. त्यावर सिनेमा सुरु व्हायचा आणि त्यासोबत गाणं सुरु व्हायचं `  गाडी बुला रही है , सिटी बजा रही है ` धर्मेंद्रचा चित्रपट ` दोस्त `  आणखी एक आवडता आणि वारंवार बघितलेला चित्रपट म्हणजे मनोज कुमारचा ` रोटी कपडा और मकान `  त्यातही गंमत डावखुरा अमिताभ पडद्याच्या दुस-या बाजूने उजवा असायचा आणि गर्दी पडद्याच्या दोन्ही बाजूनी रहायची.
     पडद्यावरच्या चित्रपट चालू आपण रस्त्यावर एखादं पोतं घेऊन त्यावर मांडी घालून बसायचं ... आपण असं रस्त्यावर बसलोय यात काही वाटायचं नाही त्या वयामध्ये. ब-याचदा पावसानं ओल्या मातीवर बसायचं ती ओल अंगभर पसरायची पण सिनेमाचं ते आकर्षण उठू देत नसे.
     अगदी भरपूर वेळा पाहिलेला आणखी एक चित्रपट म्हणजे ` आम्ही जातो आमच्या गावा ` त्यातला प्रत्येक प्रसंग स्मरणात राहिलेला आहे. त्याच काळात ` हाच मार्ग एकला `  तसेच `वहिनींच्या बांगड्या `   असे चित्रपटही औरंगाबादच्या रस्त्यांवर बसून पाहिलेत.
     आज कुंभारवाडा परिसर पूर्ण गजबजलाय. तिथून मुलांसोबत जाताना जूना गणेशोत्सव आठवतो त्यावेळी मुलांना मी सांगतो बेटा इथं रस्त्यावर बसून आम्ही सिनेमा बघायचो त्यावेळी त्यांची प्रतिक्रिया `  काय बाबा काही सांगता काय ?  अशी असते फेम, आणि पीव्हीआर मध्ये सिनेमा बघणा-यांनी अशी प्रतिक्रिया देणं सहाजिकच आहे.
     रस्त्यावरचा तो सिनेमा दाखवायचं काम माहिती कार्यालयाचे कर्मचारी करायचे. 2000 साली मी ज्यावेळी जिल्हा माहिती अधिकारी मी औरंगाबाद येथे रुजू झालो त्यावेळी त्या माहिती कार्यालयाचा बॉस म्हणून मला प्रथम आठवण त्या रस्त्यावरच्या सिनेमाची झाली ..... काळाच्या ओघात बरच चित्र बदललं आहे पण स्मृतिचित्रातला रस्त्यावरचा सिनेमा आजही बघावा वाटतो.

No comments: