Wednesday 24 August 2011

चेहरा हरवलेली माणसं ... !


          साधारण दहा वर्षे वय. वर्ग पाचवा. तसं नाही म्हणायला अभ्यासात छान प्रगती होती. चौथ्या वर्गात शाळेत सर्वप्रथम आणि सोबत जिल्ह्यातून स्कॉलरशिपच्या गुणवत्ता यादीत देखील नाव आलेलं. शाळा हा खरोखर आनंद सोहळा होता आयुष्यातला. शाळा अगदीच घराजवळ तरी बराच वेळ आधी घरुन निघायचं दप्तर पाठीवर टाकून रेंगाळत, रेंगाळात वाटचाल करायची.
     रस्त्यात मित्रांची बेरीज करीत पूर्णानंद भांडारवर गोळ्या घेणे कधी बाजूच्या झाडाखाली बसलेल्या म्हातारीकडून `लबदूघेणे तर सिझन प्रमाणं जांभळं असा फराळ चालायचा. मध्यंतरात कुल्फी असायची. तिथच विजय भेलपूरी वाला होता. हे चित्र वर्षानुवर्ष बदललं नाही आणि आजही तेच चित्र मलाच नव्हे तर त्याकाळी शाळेत असणा-या प्रत्येक सहका-याला आठवत असेल.
     शाळेचा परिसर म्हणजे संस्थाच संस्था. एका बाजूला प्राथमिक शाळा त्याच्या दुस-या बाजूला मॉन्टेसरी हायस्कूल. सरस्वती भूवन संस्थेच्या विस्तीर्ण परिसरात ही स्वतंत्र अशी वेगळी शाळा तिथं भरायची.
     आमच्या शाळेसमोर उंच तीन मजली शारदा मंदीरची वास्तू. दोन्हीच्या मध्ये आमचं विशाल असं पी.टी.ग्राउंड. याच ग्राउंडवर प्रार्थना व्हायची. शारदा मंदीर आमच्याच शाळेचा भाग असला तरी मुलींची शाळा असल्यामुळे चीनची भिंतही कमी पडेल असा कडेकोट बंदोबस्त. मोठे दोन दरवाजे असले तरी एक कायमचा बंद दुस-या दरवाज्याला एकच माणूस आत जाऊ शकेल असा दिंडी दरवाजा. त्याच दरवाजातून सर्व मुलींचं येणं जाणं होतं.
     दोन्ही इमारतीच्या बाजूला सायन्स आणि आर्टसची इमारत आणि भव्य असं क्रिडांगण. नवीन इमारत तयार झाली मात्र आमचा पाचवा वर्ग मुख्य इमारतीच्या मागील बाजूला 1920 च्या आसपास बांधलेल्या जून्या कौलास आणि मातीच्या इमारतीत होता. वर्गासमोर मोठा ओटा आणि लगतच लायब्ररीची इमारत. वर्गाची एकच रांग त्याच्या मागे पुढे पुन्हा पटांगण... खूपच भव्य असा तो परिसर.
     शाळेतून घरी जाताना रेंगाळत जाणं. त्यावेळी आजूबाजूने कॉलेजच्या मोठ्या लोकांचा वावर. त्यावेळी ते कॉलेजचे मुलं मुली म्हणजे आमच्या दृष्टीने जिज्ञासा, कुतूहल यासोबतच आसुयेचा भाग होते. आम्हाला कसं सलग 8 तासिका होईपर्यंत वर्गात रहावं लागतं. गणवेषात यावं लागतं. नखं कापा, केसं वाढवून का. सारी बंधनं होती. कॉलेजच्या त्या मुलामुलींना यापैकी एकही बंधन नाही म्हणून आसूया वाटे. एकच वही घेऊन कसं शिकतात याचं कुतूहल होतं.
     आजही ते सारे मनात शाळेत पुन्हा जाताना आसपास वावरत असतात मात्र काळाच्या ओघात त्यांचे चेहरे मात्र मनातून पुसले गेलेत. अशाच एका मुलींच्या चेहरा हरवलेल्या घोळक्याने माझ्या आयुष्यात मोठा बदल केला. एकदा रेंगाळत जात असताना सहा जणींच्या घोळक्यानं मला ` ए थांब रे म्हणत `  थांबवलं... का कशासाठी छोट्याशा हृदयात ट्रकभर धडधड सुरु झाली... एकीनं माझे गाल धरुन दुखेपर्यंत जोरात दाबले, ` क्युटय गं ` म्हणाली त्यावेळी खरच त्याचा अर्थ कळाला नव्हता ... दुसरी ` ए नको, गाल दुखेल म्हणत माझी सुटका केली... पण गालाचा छानसा पापा घेतला. तिसरीनं गुडघ्यावर बसून मायेनं जवळ ओढलं आणि केसात हात फिरवला... जा बेटा आता म्हणत बाजूच्या हातगाडीवरुन झटकन चार-पाच चॉकलेट खिशात कोंबली.
     ... प्रसंगात खूप चॉकलेट मिळाल्याचा आनंद होता, पण नंतर ` क्युट ` चा अर्थ कळाल्यावर जगणं बदलतं. त्या हरवलेल्या चेह-यांनी माझ्या आयुष्याला नेटकेपणा आणला. आपण व्यवस्थित रहावं. चांगलं दिसावं, फिट आणि स्लीम रहावं असा स्वभाव माझा बनला त्याला कारण त्या चार सहा जणी आहेत... आज चेहरे आठवत नाहीत पण प्रसंग वाचून त्या सहाजणींपैकी कुणाला आठवलं तर आयुष्याच्या प्रवासात पुसला गेलेला प्रतिमेचा दुवा पुन्हा जोडता येईल असं वाटत राहतं.
- प्रशांत दैठणकर

No comments: