Sunday, 21 August 2011

तेरे मासूम सवालोसे


शब्दांमध्ये काय शक्ती असते, याची ओळख वेळोवेळी आपणास होत असली तरी त्यातल्या त्यात संगीताची जोड लाभलेल्या शब्दात विलक्षण गती असते म्हणूनच कदाचित गाण्याची साधी लेकर झटकन दुस-या  जगात घेवून जाते. जग कधी काळी आपण जगलेलं आणि कदाचित जगलेलं.
            काळाच्या खुणा मनावर शतपावली करत असतात यात कोणतं पाऊल नेमकं कधी पडलं हे भूतकाळात डोकावतानाच जाणवतं.. त्यावेळी वर्तमानात राहून गेलेला ' सल '.. हा एकटा सल असा की ज्याचं रुपांतर कुरुपात होत नाही.. ते क्षणं कडवट वाटले होते जगताना... पण आज मागे वळून बघताना तो ऊन-सावलीचा खेळ होता इतकाच भास होतो.
            त्या जगलेल्या उन्हाची आग असून नसल्यासारखी झालीय आणि भोगलेल्या सावलीचाही आनंद जाणवत नाही आठवणींच्या प्रवासातले ते दोन वेगळे टप्पे होते आणि त्या क्षणी त्यांनी आनंद आणि वेदनेच्या भावनांचा पूर आणला होता.. आज त्याकडे बघताना स्थितप्रज्ञपणानं माझच मन कबूल करतं की तो अपरिहार्य भाग होता आयुष्याचा.
            आज म्हणूनच कदाचित सुखानं हुरळल्यासारखं वाटत नाही आणि दु:खात पोळल्यासारखं ही वाटत नाही याला अनुभवाचं शहाणपण म्हणायचं की भावनांमधील रुक्षपणा... असं असलं तरी मागच्या काळात धाव घेणारं मन आताच्या एका लेकरीवर पुन्हा त्या अनुभूतीकडे खेचलं जातं... ओळी पाझरत जातात आणि डोळेही... गीत सुरु राहतं ... तुझसे नाराज नही जिंदगी ... हैरान हूं...तेरे मासूम सवालोसे परेशान हूं |
-          प्रशांत दैठणकर

No comments: