Monday 29 August 2011

गणपती बाप्पा मोरया ...!



          व्यवस्थापनाचे आयुष्यातील पहिले पाठ कधी गिरवले याचा विचार करताना मला टिळकपथवर आमच्या चिमुकल्या गँगने साजरा केलेला गणेशोत्सव आठवतो. 1981-82 च्या त्या डिस्कोच्या जमान्यातला तो गणेशोत्सव.
     कुलकर्ण्यांचा राजू , नाईकांचा सुन्या, दाभाडेंचा गण्या, जोश्यांचा मक्या आणि गल्लीतली सत्या,पावा, संदीप अशी सारी आमची गँग. आपणही गणपती बसवू असं ठरवलं. लोकांकडून वर्गणी गोळा करायची गणपती आणायचा आणि आरास करायची इतकं सोप गणित होत. सुदैवानं टिळकपथावर ,(त्यावेळचा तो शहराचा मुख्य रस्ता होता)  एक रिकामं दुकान अनायासे मिळालं. आज खरच याचा हेवा वाटतो कारण औरंगाबाद सारख्या शहरात गणेश महासंघालाही दरवर्षी जागा बदलावी लागतेच.
     चार डोकी एकत्र आली, बाल बुध्दी प्रमाणं नियोजन झालं. पावती पुस्तक, न्यास नोंदणी याची माहिती आम्हाला असणं शक्य नव्हतं. मग मीच मागिल वर्षीच्या को-या पानांची बाईंडिग केलेली वही घेतली आणि आमचा मोर्चा बढई गल्लीच्या प्रत्येक घराकडे निघाला. सव्वा रुपया ही स्टॅन्डर्ड वर्गणी होती. त्याखाली वर्गणी स्वीकारायची नाही हे निश्चित. पाच रुपये वर्गणी देणारा सज्जन आणि अकरा रुपये देणारा सधन असा सोपा हिशेब. सुदैवानी आसपासच्या दुकान मालकांनी सधन असल्याचे दाखवून दिल्याने वर्गणी भरपूर जमली.
     मी घरुन हिशेबासाठी वही आणलेली, त्यामुळे पुढचे व्यवहार आपसुकच माझ्या गळ्यात टाकून सगळे मोकळे. तू आमचा कोषाध्यक्ष असं सगळ्यांनी सांगितलं. आता जबाबदारी आपणावर टाकली म्हणून मला देखील मुठभर मास चढलं. शाळेच्या दप्तर पेटीला मग गणेशोत्सवात  सुटी देवून त्या पेटीचं रुपांतर तिजोरीत करण्यात आलं. पैशांच्या व्यवहारात गडबड नको म्हणून मी ही व्यवस्था केलेली.
     गल्लीच्या मागच्या मैदानावर मोठ्या लायटींगसह मोठ्या मंडपात गणपती बसवला जायचा मंडळाचं नाव गाजलेलं आणि अनेक पुरस्कार देखील मंडळाला मिळालेले. मंडळ होतं त्रिमूर्ती गणेश मंडळ, आम्ही तास न् तास त्या नाचणा-या दिव्यांची मजा बघायचो.
     ` हरी ओम हरी `  आणि ` रंभा हो हा `  असा डिस्कोचा धिंगाणा चालायचा. आपल्या मंडळाचं नाव काय ठेवायचं यावर चर्चा सुरु असताना मी सुचवलं त्रिमूर्ती बाल गणेश मंडळ आणि ते लगेच मंजूर झालं.
     आर्थिक नियोजन व्यवस्थित असावं यासाठी मग मी स्वत: शेजारच्या चाचूच्या किराणा दुकानातून गुलाल, नारळ, पंचखाद्य आणि जरुरीच्या वस्तूंची खरेदी केली. पालोदकरांच्या रसिकराज मधून दिव्यांची माळ आणि विजेचे बल्ब आणले. मराठवाड्यात या बल्बला गोळा तर ट्यूबलाईटला नळी म्हणतात. आमच्या मराठवाड्यात पेनचं रिफिल नसतं तर पेनची कांडी आणि पेन देखील कांडीचं पेन असतं तर फाऊन्टन पेनला पत्तीचं पेन म्हणतात.
     सलग दहा दिवस सकाळ संध्याकाळच्या आरतीचं नियोजन त्यासाठी ताट तयार करणे त्याचप्रमाणे नवव्या दिवशी गणपतीसमोर सत्यनारायणाची पूजा. रात्री तिथच मुक्काम असे दहा दिवस कसे उडून गेले हे कळलंच नाही .... असा हा बाल गणेश मंडळाचा दहा दिवसाचा व्यवहार माझा पहिला व्यवस्थापनाचा धडा होता. आताही गणेशोत्सव म्हटलं की हा अनुभव नव्याने ताजा होत असतो. आणि मनातून गणेशाला वंदन करीत आपोआप शब्द ओठांवर येतात गणपती बाप्पा मोरया !

No comments: