Wednesday 17 August 2011

मन माझं .. मी मनस्वी ....!


शांत आणि बंदीस्त प्रवाह.फक्त वा-यासोबत उठणारे हलके तरंग.कुणी अचानक त्यात दगड फेकावा आणि पाण्यावर तरंग आणि त्याच्या लाटा ... यावरुन परतणारे ते सारे तरंगांचे वर्तुळ. नव्या लाटांना प्रेरित करत आणखी आंदोलनं उभी करतात. त्यात स्तब्ध असणारं ते पाणी एक दगडाच्या फेकीनं गढुळतं आणि तरंगांचा कोलाहल सुरु होतो... मनाचं देखील असंच काहीसं आहे.
     कोण म्हणतं शब्दात शक्ती नसते, किमान नकारात्मक शब्दात तर शक्ती जादा असते आणि म्हणूनच असे शब्द कधीच रिते परत जात नाहीत. ते मनाला पूर्णपणानं आंदोलीत करीत जातात. होकार मोरपीसासारखा अंगावर फिरत नसला तरी नकार मात्र अंगावर काटे आणत असतो आणि असच काहीसं आयुष्य असतं... शब्द ... आणि त्यांचे वार.
झेलला जरी नाही मी
                     पण होणारा होतोच वार
                     कितीही सांभाळून ठेवा
                     शब्द काळजात आरपार
     अशी मनाची अवस्था झाल्यावर ती बोच कायमची मनात राहून जाते. कृतीनं वाईट व्हावं, बोलून होवू नये असं जे सांगणे असतं ते यासाठीच असतं.
     आयुष्यात असाही काळ येतो जिथं सावली देखील साथ सोडते तिथं सख्या सवंगडयांची काय गत आणि म्हणूनच हा काळ आल्यावर मनाच्या खंबीरपणाची परीक्षा सुरु होत असते. मित्र काळ आणि पैसा या त्रिमितीतल्या बाबी आहेत. त्या येतात आणि जातात. माणसं ही झाडावरल्या पानांसारखी असतात. आपण कधी-कधी याचे पैलू तपासले पाहिजेत.
     पान पिकलं आणि गळालं हे समजतं. झाडं स्वत: पानं तोडत नाहीत. परिस्थितीच्या वादळात पानं झाडाची साथ सोडतात. प्रसंगी विराट निसर्गाच्या तांडवानं वृक्ष उन्मळून पडतो पण पानांची ती साथ सुटत नाही. मातीशी असणारी नाळ तुटली तरी चालते.
                वाटचाल करताना वादळातून
                     आयुष्याचे आर्त ते कळते
                     मातीशी नातं ते राखून
                     पुन्हा नव्याने हे फळते
                    आंदोलनं झाल्यावर पुन्हा
                  स्थैर्याच्या प्रवासाला धैर्य लागतं. 
                                             ओढ अंतरीची चुकत नसते 
                                              ओल मायेची सुकत नसते... 
                                              चुकली माणसं सारी म्हणून 
                                               आपण मात्र  चुकायचं नसते.
                                            प्रशांत दैठणकर

No comments: