Monday, 8 August 2011

श्रावण ... !

                                      
         श्रावण आणि पाठोपाठ येणारा गणेशोत्सव त्यालगत नवरात्र, दसरा आणि दिवाळी अतिशय सुरेख असा कालावधी श्रावण म्हणताच, मन कधी बालपणात तर कधी तारुण्यात जातं आज मागे वळून बघताना बालपणीचा श्रावण पुन्हा एकदा डोळ्यासमोर तरळायला लागतो.
अगदी साधेपणाचं आणि मुल्य म्हणजे शांततेचं आयुष्य आजच्या सारखी घाई नाही. आज मुलांना तो काळ कधीच दिसणार नाही इतकं पुढे आलो आहोत याची खंत वाटत राहते.
घर बढई गल्लीत. शाळेची घंटा घरात ऐकू यायची. वाहनं मोजकीच दारोदारी रांगोळी आणि सायकली हमखास दिसायच्या. दोन पैसे गाठीला असणारी मंडळी शान मध्ये `लुनावर मिरवायची असा तो काळ.
सकाळ होताच हातात परडी घेऊन धावत सुटायचं. बाजूच्या सरस्वती कॉलनी अर्थात एस.बी. कॉलनीत आसमंतात प्राजक्ताचा दरवळ आणि रस्त्यालगतचा तो केशरी देठ असणा-या पांढ-या फुलांचा सडा. टाचा उंचावून झाड हलवायचं मग आणखी सडा पडायचा ती फुलं परडीत वेचायची.
कम्पाउन्डच्या आत पडलेल्या सड्यावर त्या बंगल्यातील मंडळी समाधानी असायची. फूल आणि पानं का तोडताय रे...असं कुणी खेकसल्याचं आठवत नाही. तिथून पुढे धाव ती शाळेलगतच्या बॉटनीकल गार्डन मध्ये तिथून फुलं आणि पानं जमा करायची. शाळेचीच मुलं म्हणून मास्तरही रागवत नसत हे खास.
श्रावण म्हटलं की दर दिवशी कुणाच्या ना कुणाच्या घरी सत्यनारायणाची होणारी पूजा. प्रसाद घ्यायला धाव घ्यायची, पूजेत टाकायला पैसे अभावानेच असायचे. तिर्थ प्राशन करुन मोठ्या माणसांसारखं शेंडीला हात लावताना आपण मोठं झाल्यासारखं वाटायचं. केळीच्या पानाच्या हिरव्या तुकड्यावर तो लुसलुशीत शिरा घेऊन खाताना मोठी गंमत वाटायची.
शाळेत जाताना पाफस आल्यावर दप्तरासह भिजायचं. त्यावेळी वॉटरप्रुफ हा प्रकार नव्हता. एका शबनमच्या झोळीत पुस्तकांचा ढीग आणि पाठीवर झोळी असायची पुढे वडीलांनी अल्युमिनियमची पेटी दिली त्यातलं दप्तर ही देखील मोठी शान होती.
सोमवारी महादेव मंदिर तर शनिवारी हनुमान मंदिर असं म्हणत खडकेश्वर आणि सुपारी हनुमान मंदिराचं दर्शन ठरलेलं. आई-वडीलांचा श्रावण म्हणजे उपवासाचा महिना, उपवास म्हणजे आम्हा बच्चे कंपनीची चंगळ गरमा गरम साबुदाण्याची उसळ, उकडलेली राताळी, दही-साखर-साबुदाणा आणि तळलेल्या  बटाटा व साबुदाण्याच्या पापड्या खास आकर्षण असायचं ते साबुदाण्याच्या कुरुडईचं.
पूजेसाठी वाळू कुणाकडेही मिळायची. आता ती देखील विकत मिळते. उपवासाचे पदार्थ  `रेडीमेड` आले आणि पानं व फुलं बाजारातून विकत आणायची वेळ आणि तसा काळ आलाय. त्यामुळेच कदाचित आजच्या पिढीला तो फिल कधीच येणार नाही पण आजही श्रावण म्हटलं की मनाचा एक कोपरा त्या प्राजक्ताच्या सुगंधानं नव्याने ताजातवाना होते.
                     प्रशांत दैठणकर

No comments: