Friday, 19 August 2011

`O ` ओबेसिटीचा...........


आपल्याकडे सर्वात मोठी समस्या कोणती आहे ? या प्रश्नाचं उत्तर व्यक्तीपरत्वे वेगळं येईल परंतु साधारणपणे 50 टक्के लोकांचं यावर एकमत होईल आणि ते सांगतील आमचं वाढणारं वजन ही आमची समस्या आहे. हल्लीच्या या धकाधकीच्या युगामध्ये या समस्येने अनेकांना ग्रासलय आणि वजन वाढण्याच्या या प्रकारामुळे एक प्रकारचा मानसिक ताणही या व्यक्तींवर राहतो.
                वजन नियंत्रणात राहणं खरच इतकं अवघड आहे का ? या प्रश्नाचं उत्तर नाही असं देता येईल. कारण वजन नियंत्रणात ठेवणं हे अतिशय सोपं काम आहे. आपण वजन वाढ होण्याची नेमकी कारणं शोधून काढलेली आहेत आणि त्याचा विचार करुन काही गोष्टी टाळल्या तर आपलं वजन सहजरित्या नियंत्रणात राहील.
                आहार आणि आरोग्य या एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. आहार सांभाळला की आरोग्य सांभाळले जाते. खादाडपणा हे लठ्ठपणा येण्याचे मुख्य कारण आहे. मुळात आपल्या शरीराची  असणारी गरज आणि आपली पचनशक्ती यानुरुप आहार असेल तर लठ्ठपणा येत नाही. खाण्याची आवड असेल तर मात्र वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी वेगळे मार्ग बघावे लागतात.
                आपण अन्न घेताना त्यातून शरीराला आवश्यक प्रथिने, स्निग्धांश, जीवनसत्वे मिळतील याचा विचार करावा. साखर आणि स्निग्ध पदार्थ ज्यात अधिक प्रमाणात आहेत असे पदार्थ खाताना आपण मर्यादा पाळणे आवश्यक आहे अन्यथा हे पदार्थ शरीरात अतिरिक्त झाल्यास चरबीत रुपांतरीत होतात आणि चरबीमुळे लठ्ठपणा येत असतो.
                साधारणपणे तेल आणि तेलकटपणा असणारे पदार्थ तसेच साखर, चॉकलेट आणि आईसक्रीम यांचा खाण्यात असणारा वापर एका विशिष्ट मर्यादेत ठेवणं गरजेचे आहे. या पदार्थाची आवड असणं समजण्यासारखं आहे. मात्र त्याचे परिणाम सुरु झाल्यावर, लठ्ठपणा आल्यावर परतीचा मार्ग अवघड असतो.
जास्त जेवण करणं हे जसं आरोग्यावर परिणाम करतं तसेच केलेले जेवण शांतपणे केलेलं नसेल तर त्याचाही विपरित परिणाम होत असतो. घाईघाईने खाणं चुकीचं आहे मुळात आपली यंत्रणा ज्यावर चालते त्या अन्नासाठी दिवसातला थोडातरी निवांतवेळ आपल्याला काढता आलाच पाहिजे. सतत चिंताग्रस्त राहणं हे देखील चरबी वाढण्याचं आणखी एक कारण आहे हे लक्षात ठेवा.
                आपल्या आहाराच्या जोडीला दिवसातून किमान 20 मिनिटे आपण व्यायामासाठी राखीव ठेवल्यास नुसता लठ्ठपणा नव्हे तर आजारही टाळणं शक्य होईल. आपण व्यायाम करताना शरीरातील ऊर्जा बाहेर टाकली जाते. आपण या प्रकारे चरबीच्या ओव्हरफ्लो चा निचरा होईल. या प्रकारे व्यायामाचा थेट दृष्य फायदा आपणास बांधेसूद शरीराच्या रुपात मिळतो.
                आपलं शरीर हे हाड,मांस, सांधे, स्नायू यांची अजोड कृती आहे. या सर्व भागांना नियमित व्यायामाच्या माध्यमातून नवचेतना भेटत असते आणि त्यातून या सर्वांची कार्यक्षमता वाढत असते. त्वचेला येणारा शिथिलपणा सुरकूत्यांमध्ये परिवर्तित होऊन शरीराला वृध्दत्व येण्याची स्थिती व्यायामामुळे काही काळ लांबविणे शक्य आहे.
                शरीराचं वजन वाढल्यावर हालचालींची गती मंद होते. याच्या परिणामास्वरुप रक्तदाब वाढणे, हृदयावर ताण पडणे, रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्यास मधूमेह होणे. त्याचप्रमाणे हृदयावर ताण पडत असल्याने हृदयविकारास आदी अनाहून पाहुणे शरीरात येऊन बसतात. या नावडत्या पाहुण्यांना व्यायामामुळे आपण दूर ठेवू शकतो.
                तणावमुक्त आणि आरोग्यसंपन्न जीवन हे नुसतं ध्येय ठेवून चालणार नाही तर त्यासाठी प्रत्यक्ष कृती करण्याची गरज आहे. अर्थात लठ्ठपणाच्या समस्येवर लक्ष केंद्रीत करता त्याच्या उपायांवर लक्ष केंद्रीत केल्यास अधिक फायदा होईल.
-          प्रशांत दैठणकर

No comments: