Tuesday 10 July 2018

तू ..मी अन् पाऊस...

तो जरा उशिराच आला पण आता मनापासून आला..... मृगापासून त्याची वाट बघितली .नाही म्हणायला त्यानं हजेरी लावली पण दरवेळेस रात्रीच बरसला ... आज मात्र त्यानं कसर भरुन काढली..!

पहाटवाऱ्यात त्याला अंगावर झेलायचं ठरवलं आणि पहाटेच निघालो ... मी आणि माझी हिरो होंडा .. तसा हा सिलसिला खूप जुनाच म्हणायचा .. 1994 मध्ये मी पहिली गाडी घेतली... माझा आवडता रंग अर्थात BLack याने काला ..! आणि टोकाची बाब म्हणून सांगता येईल .. माझी भाची जन्मली .. याच बाईकवरुन मी बहिणीला डिलेव्हरी साठी दवाखान्यात नेलं होतं .. भाचीचं नाव गाडीवर टाकलेल तिचं नाव श्वेता ...म्हणून ती पहिली बाईक चांगली लक्षात राहिली माझ्यासह सर्वांना देखील.

आज बाईकवर जाताना जाणवलं की बॅकसीट आज रिकामं आहे . .
. त्या वेळी पावसात भिजताना तू असायची आज मधू इथं अन् चंद्र तिथं . . . अचानक पाऊस आल्यावर आडोशाला पळणाऱ्या रस्त्यावरील गर्दीची मजा घेत मस्तपैकी पावसात भिजण्यातलं थ्रिल काही औरच . . काय वेड लागंल का या दोघांना . . . अशा प्रतिक्रिया बघत आपण आपली राईड जारी राखायची.... वेडं असतं मन आणि वय तर जास्तच वेडं असतं या वयात ..' पावसात ' त्याच्या सोबत धुंद होणं . . . नशा होती नशा. . .!

. . मग कधी तर पाऊस आला म्हणत मुद्दाम घरातून बाईेकवर राईड घ्यायला निघणं सा-यांच्या सल्ल्यांना धुडकावत घराबाहेर पडायचो .. मग तू मी आणि पाऊस तिघेही सारखाच दंगा करायचो . . सारं सारं आठवत होतं.

निसर्गाचं स्वागत करावं . . निसर्गात रमावं हे वेडच म्हणा . . .
त्या पावसात अनेकदा चिंब चिंब भिजून आलोत दोघे . . पण कधी ही पावसामुळे सर्दी झाली नाही. की या भिजण्याने आजारपण आलं नाही. . अगदी चिबं भिजल्यानं कुडकुड थंडी वाजेपर्यंत ते भरकणं
. . . Nature Cares . . . Nature Cures असं काहीसं नातं निसर्गाशी . . . बदलत्या त्रतू नुसार समरस झाल्यावरच निसर्गाचा आणि जीवनाचा खरा आनंद मिळतो . . .!

जशी तुझा साथ तशीच ती नंतर मुलं झाल्यावर मुलांचीही गट्टी जमवली आपण या पावसाची..पाऊस आल्यावर मुलांना चला भिजायला... म्हणत भिजायला घेऊन जाण्यात देखील आगळा आनंद आहे . . ज्यावेळी भिजू नका रे सर्दी होईल . . .
आजारी पडाल अशा शब्दात मुलांना धाकानं घरी ठेवणारे अनेकदा बघितले . . तो भिजण्याचा आनंद त्या पिलांच्या आयुष्यात का नसावा . .! पालक इतके कसे अरसिक असावेत... इतकं काय जपायचं सर्वांना. कदाचित त्यांनी त्यांच्या तारूण्यात असा आनंद घेतलेला नसावा असं वाटून जायचं त्यावेळी.

काल रात्रीला तो आला जणू काही तो रात्रीचा पाहुणा मुक्कामाला आलेला .. रात्री पाऊस आल्यावर माझी आई म्हणायची आला हा रात्रीचा पाहुणा आता सकाळपर्यंत पाऊस राहणार .. अगदी खरंच आहे ते याची प्रचिती आयुष्यात वारंवार येते . . . इथं बंगला जुन्या पध्दतीचा असल्यानं त्यावर पत्रे टाकलेले आहेत . . पाऊस थेंबाचा कमी अधिक होत जाणारा तालबध्द ऑर्केस्ट्रा सुरु होता रात्रभर .
. . सिमेंटचा स्लॅब मजबूत असल्यानं पावसाचा आवाजच जाणवत नाही आपल्या शहरी घरांमध्ये . . कृत्रिम पणा आणून आपण जणू सूर , ताल यांना अटकाव केलाय अशी घरं बांधून . . .!

. . . कॉलेज मधले तुझ्या सोबतचे दिवस . . . तेव्हाही घर असं पत्र्याचच होतं . . पडणाऱ्या प्रत्येक थेंबाचा नाद कानावर असायचा . . खिडकीतून दिसणाऱ्या त्या पत्र्यांच्या नाल्यांमधून पत्रावर पडलेल्या पाऊसधारा.... पुन्हा नव्याने मोठया होत जमिनीकडे धाव घेताना मध्येच त्याला हातावर झेलून एका हातात गरम वाफाळता चहाचा कप ठेवणं . . . कधी त्याच्या जोडीला मस्त खमंग कांद्याची भजी.. आहाहा जन्नतच ना...अजून विसरलंच नाही . . . अन् विसरणार देखील नाही.
अंगण हवं . . त्यात पावसाचं तळं साचावं . . . त्यातला तो कागदी होडयांचा खेळ . . . एखाद्या ओहोळासोबत होडी गती घ्यायची . . . मग भिजून काही अंतरावर तिला जलसमाधी . . . पुन्हा एक नवी होडी . .! अंगणं संपली आता त्यांची जागा लाद्याभरल्या कुंपणांनी घेतली आताही तळं साचतं पण ते कधी कधी शहरभर दिसतं . . . कागदी होडयांच्या जागी तुंबलेल्या त्या पाण्यात थांबलेल्या हळू हळू रांगणा-या गाडयांच्या लांबच लांब अशा रांगा दिसतात.

तुझ्या सोबत झेललेला पावसाच्या प्रत्येक थेंब अजूनही जपलाय . . मनात . आता पावसाचे हे मोती बरसायला लागल्यावर पहिले तुझीच आठवण येते . . . इथं विदर्भात चिंब भिजून आठवणीत पाऊस एकटयानं झेलला म्हणून तर कालीदासानं मेघांना आपलं दूत बनवलं होतं ना . . .!

काळ बदलला . . . आता त्या ढगांची जागा तंत्रज्ञानाच्या क्लाऊड रुपी ढगांनी घेतलीय . . . इथं पडणाऱ्या पावसाचा व्हिडिओ क्लाऊडवरुन तुला नक्कीच पाठवता येतो पण मोबाईलच्या स्क्रीनवर तो बघताना .
आणि मोबाईल टिव्हीला जोडून मोठ्या पडद्यावरही शक्य आहे बघणं ... पण खऱ्या पावसाचा फिल मात्र येत नाही . .!


मग असं चिंब चिंब भिजूनही तू नसल्यानं मन मात्र कोरडंच राहतं . . . आगळा असा रितेपणा जाणवयला लागतो . . . मग सुरु होतो तो आठवणींचा पाऊस . . . त्याचा शेवट कधी कधी डोळयातल्या पावसानं होतो . . . अगदी अनावर होतं त्यावेळी मी झटकन पावसात धाव घेतो.

मला चार्ली चं वाक्य अंतर्मनात सांगत असतं

I always Like waking in the rain , So no one Can see me crying .

मग मी देखील पावसात चालायला लागतो








8 comments:

Unknown said...

आयुष्यातले काही आनंदी क्षण डोळ्यासमोर आलेकी आपण वर्तमान काळातन भूत काळात कधी जातो काही कळतच नाही.......आता देवाला एकच मागणे राहते लहानपण देगा देवा

madhyam vrutt seva said...

अप्रतिम

Prashant Anant Daithankar said...

धन्यवाद

Prashant Anant Daithankar said...

Very true

Unknown said...

सर अप्रतिम

Ritesh Bhuyar said...

स्मृतीच्या साठणीतील पावसाच्या उत्तम आठवणी, छान झाली पोस्ट

Prashant Anant Daithankar said...

Thank you Ritesh

Prashant Anant Daithankar said...

धन्यवाद