Thursday 26 July 2018

अल्बम . . आठवणींचा . . !

आठवणींची वीण क्षणागणिक पडत जाते . . त्या जगलेल्या क्षणांचा मधल्या काळात काहिसा विसर पडून जातो पण ' झुक्या ' त्याची आठवण करुन देतो . ..
असाच काहीसा विचार सकाळी मनात आला . . . कारण देखील तसं होतं . . . सकाळी फेसबूक वाचायला घेतलं त्यावेळी ' मेमरीज ' चं पान सर्वात प्रथम खुलं झालं . . समोर फोटो होता चिरंजीव मास्टर वेदांतचा . . . सन 2012 मधला तो फोटो वेदांत शाळेला जायला निघाला त्यावेळचा . . . !

तो क्षण जगलेला असा अवचित आठवण्याचं काही कारण नाही पण आठवण करुन देणारं कुणी असेल तर त्यासारख्या आनंद जगात दुसरा नाही . . आपण रोज धावत असतो . . . धावत राहतो पण या धावण्यात जगायचं विसरलो की काय असा प्रश्न पडतो .

माणसाला निसर्गानं जी मोठी देणगी दिलीय ती म्हणजे विस्मरणाची . . .
आपण आजचा क्षण विसरु शकतो म्हणून उद्या पुन्हा ' फ्रेश ' होवून जगू शकतो विसरण्याची ही देणगी मिळाली नसती तर स्मृतींचा नुसता कोलाहल झाला असता . . . आजच्या जमान्याच्या भाषेत सांगायचं तर ' दिमाग का दही ' झाला असता .

आपल्या प्रत्येकाच्या भावविश्वात आपण जगलेले चांगले -वाईट क्षण गोळा होत असतात, किमान आता ते जपायचं तंत्र सापडलय . . छायचित्रांच्या रुपानं त्या क्षणाची साक्ष देणारा छायाचित्रांचा अल्बम प्रत्येकाकडे असतो पण त्यातही केवळ आनंदी क्षण जपले जातात . . आयुष्यातील दु :खाचा काळ आणि भोगलेल्या वेदना यांचा अल्बम केवळ मनात तयार होतो . . . हा अल्बम कधी अचानक छेडल्या गेलेल्या गाण्याच्या सुरावटीसह समोर येतो त्यावेळी नकळत डोळे पाणावतात समोरच्या व्यक्तीला बोध होत नाही . . . आपली आतली वेदनेची कळ आपणच उरात जपायची असते . . . माझ्यातला ' मी ' इतरांना कळू नये याची ती केविलवाणी धडपड असते . . . पण डोळे दगा देऊन जातात . . समोरच्या प्रश्नांकित चेहऱ्याला मी पुन्हा प्रश्नांकित ठेवून कमळाप्रमाणे भावनांना चापण्यांच्या पाकळ्यांमध्ये बंदीस्त करुन ठेवतो . . . हे प्रत्येकासोबत वारंवार होत असतं . . . !

आयुष्याच्या या सुख दु:खाच्या हिंदोळयावर मन सतत झुलत राहतं . . .
आसपासची परिस्थिती कशीही असली तरी हिंदोळयाची ही आंदोलने सुरु राहतात अविरत . . . मी जितका स्वत:ला जगासमोर मांडायचा प्रयत्न करतो त्याही पेक्षा अधिक प्रमाणात आणि अधिक तिव्रतेने स्वत:ला जगापासून लपवायचा प्रयत्न करतो.

माझ्यातला नायक जगासमोर मी मांडत जातो . . ते मांडण सरत जातं आणि उरात उरतो तो केवळ माझ्यातला खलनायक . . . तो मला जगासमोर न्यायचाच नसतो . . .तो लपवण्याची सारी धडपड सुरु असते पण स्मृतींचा हा अल्बम मी एकाकी असताना वारंवार खुला होत जातो . . . ज्याचं विस्मरण व्हावं त्याच गोष्टी आयुष्यात मुद्दाम होवून स्मरणात राहतात.  सुखाचे जगलेले क्षण आयुष्यातून कापरासारखे उडून जातात . . . ते जगताना त्याचा आनंद जरुर होतो पण ते हवेत विरुन जात असतात म्हणूनच मला त्या क्षणांचा ' अल्बम ' कदाचित आवडत असेल.

तंत्राने आज सोय करुन ठेवलीय की मी माझ्या आनंदाचा क्षण जपू शकतो आणि मी तो जपतो देखील. काळाच्या प्रवाहात मागे वळून बघताना तो सुखाचा अल्बम मला पुढे वाटचाल करण्याची उभारी देतो . . . काळाशी लढताना आलेल्या मनाच्या नैराश्याच्या जळमटांना सारुन सकारात्मकतेने पुन्हा जगाकडे बघायचं बळ देतो .


नाण्याच्या दोन बाजू प्रमाणे मनाच्याही दोन बाजू असतात हे खरं आणि ती दुसरी बाजू अधिक लवकर विस्मरणात जात असल्याने सुखाच्या त्या क्षणांचा अल्बम बनवता आणि जपता आलं म्हणजे इहलोकाची ही वाट अधिक सोपी होते. आयुष्यात चालणं जसं थांबत नाही , जगण जसं थांबत नाही तसं विस्मरण देखील थांबत नाही. काल सकाळी काय जेवलो याचं आज विस्मरण लवकर होतं मात्र चहाच्या चटक्यानं जीभ भाजली तर ती चार दिवस त्रास देते . . . असा अनुभव आहे की चुकून पायाला ठेच लागली म्हणून आपण खूप जपायला सुरुवात करतो पण नेमकं निथेच वारंवार जखम होते . . . दुसऱ्या भागावर नेम धरुन अधिक वेदना देण्याचा चंग दैवानं बांधलाय अशी काहीशी शंका यायला लागते . . . मनाचं फार काही वेगळं नाही .

दिल टुटनेपर बार बार वोही याद आता है . . . . वहीं फिर चोट लगती हैं जहां के घाव अभी ताजा है . . !

सुख हे आलं आणि गेलं आणि दु:ख मात्र मुक्कामी राहिलं या मनात माझ्या....
मग त्या दुखऱ्या क्षणांचा डोंगर एव्हरेस्टपार गेला असं वाटायला लागतं. अशा त्या क्षणी नकारात्मकतेचा कडेलोट होण्याच्या नेमक्या क्षणाला.... हा अल्बम एखादा विस्मरणात गेलेला आयुष्यातला चांगला क्षण समोर आणतो... कडेलोट होण्याच्या नेमक्या क्षणाला... हा अल्बम एखादा विस्मरणात गेलेला आयुष्यातला चांगला क्षण समोर आणतो.... कडेलोट झाला तरी.... हे सुखाचे क्षण माझे पंख बनतात आणि त्या पंखामध्ये बळही देतात उडण्याचं. पुन्हा जगण्यासाठी मग मी त्या उंचावरुन भरारी घेतो आयुष्याच्या आसमंतात.... ती त्याक्षणी घेतलेली गरुडभरारी असते.....!

- प्रशांत दैठणकर
9823199466



No comments: