Tuesday 3 July 2018

..... फ्लॅशबॅक !


सहज म्हणून नजर गेली अन् तिथं स्थिरावली...... ती मनापासून बोलत होती पण माझं मन वेगळया विश्वात पोहोचलं होतं. तिच्या बोलण्याकडे माझं लक्ष आहे असं दाखवण्याची अगदी केविलवाणी धडपड मी करीत होते. ..... माझी नजर तिच्या त्या गहिऱ्या डोळयांवर होती आणि मन कुठेतरी त्या कॉलेजच्या दिवसात भटकत होतं.

बोलता- बोलता ती थांबली आणि मी भानावर आलो. माझा मलाच प्रश्न पडला की माझं मन आज अचानक असं का भरकटलं...... तसं नाही म्हणायला मनावर कोणीच नियंत्रण ठेवू शकत नाही पण तिच्या त्या काजळाने उठून दिसणा-या   सुंदर डोळयांनी मला भूरळ घातली होती.

आयुष्याचं कोणतं वळण कुठे घेऊन जाईल ते सांगणं खरच अवघड असतं......
कॉलेजचा काळ असाच आठवावा...! खरं म्हणजे विसरच पडला नाही त्या दिवसांचा कारण ते अगदी काल जगलय इतकं ताजं आहे.

साधारण श्रावणातला तो काळ. श्रावणसरी लपंडाव खेळत होत्या.... ती कॉलेजच्या कोपऱ्यावरुन येताना दिसली आणि मी बघतच राहिलो. इतक्या अंतरावरुन तिची नजरानजर झाली आणि अवचित पावसाची सर आली.... मी जागीच थिजल्यासारखा, वरुन पाऊसधारा बरसत होत्या लक्ष मात्र तिच्यावर..... ती देखील हातातली छत्री न उघडता मस्त पावसाचा आनंद घेत होती. मलाही भिजताना बघून तिला हसू आलं....तळहातावर पाऊस झेलत ती बाजूने निघून गेली.... मी तिच्याकडे अन् ती माझ्याकडे..... बाजूने जाताना तिने झकास असं 'स्माईल' दिलं.

..... ती पहिली भेट असं म्हणता येईल. तिला पाहून मोहोरलेलं मन तिचाच पाठलाग करीत होतं....... एक वर्ष ज्युनियर होती ती....
. नजरभेटीचा हा खेळ आठवडाभर सुरु होता.

हमसे आया ना गया

तुमसे बुलाया ना गया


अशा स्थितीत आठवडा घालवल्यावर मी स्वत: हिंमत करुन तिला पायऱ्यांवर थांबवून बोलायला सुरुवात केली.... मला जाणवलं तिलाही माझ्याशी बोलायचं होतं. परिचय झाला ......वाढत गेला आणि वाढतच राहिला.... आईस्क्रीमच्या बहाण्याने रेस्टॉरन्ट मध्ये तासभर तर कधी दोन- दोन तास गप्पा मारत बसायची सवय जडली दोघांना....

आता इतक्या वर्षांनी विचार करताना माझा मलाच प्रश्न पडतो.... काय बोलायचो आपण दोन-दोन तास तिथं ... नेमके काय विषय होते गप्पांचे .... तसा तो काळ खूपच संथ होता.....ना मोबाईल ना फोन.... अशाच भेटींचा सिलसिला सुरु राहिला तो देखील जमानेसे छुपके सुरु होता.....!
मांजर डोळे मिटून दूध पिते.... पण ते साऱ्या जगाला दिसत असतं. तसं आमच्या या भेटी सर्वांना माहिती होत्या. नंतर- नंतर सर्वत्र चर्चा झाली..... Love असतं तरी ते Arrange करुन एकत्रित वाटचाल सुरु झाली.... या साऱ्या प्रवासात किती दूरवर चालत आलो हे कधी मोजलंच नाही.......!

अचानक ते सारे गुलाबी दिवस आठवले...... तिचं बोलणं थांबलं..... ती प्रतिसादाची वाट बघत होती.... अर्थात माझ्या मनातला ' फ्लॅशबॅक ' तिला थोडाच दिसणार होता..... तिच्याही नजरेत ती जादू होती.....इतक्या वर्षांनी इतकं साम्य... तीच नजर.....मी सावरुन " हं काय म्हणालात " असं म्हटल्यावर तिच्याही ध्यानात आलं की तिच्या बोलण्याकडे माझं लक्षच नव्हतं..... तिनं डोळयांवर आलेली केसांची बट अलगद कानामागे सारली ...... आता मात्र तिची नजर माझ्या डोळयात काही तरी शोधत होती आणि संमतीदर्शक हसू  आता तिच्या चेहऱ्यावर दिसत होतं.... 
.... 
त्याक्षणी ती अधिकच सुंदर भासली.
आता मात्र .....मन वर्तमानात होतं.....! 





- प्रशांत दैठणकर

9823199466

No comments: