Thursday 5 July 2018

' जिओ मेगा टू गिगा' चा ...जोरका धक्का....!

व्यवसाय करताना यश मिळवण्याचे जे मार्ग असतात त्यातील एक महत्वाचा असतो तो Surprise Factor ज्याला आपण सोप्या मराठीत ' धक्का तंत्र ' असे म्हणजे असाच एक धक्का रिलायन्स जिओ ने आज ' मेगा ते गिगा ' च्या रुपाने दिला. यामुळे येणाऱ्या काळात किती कंपन्यांना आपला गाशा गुंडाळावा लागेल किती कंपन्या कर्जात बुडतील याचा ढोबळ हिशेब आतापासूनच लावंणं सुरु आहे.

तांत्रिक प्रगतीचा वेग आता इतका प्रचंड झाला आहे की, आपण आता विज्ञानकथा प्रत्यक्षात जगत आहोत असं वाटेल. मी फेसबूकवर एक कमेंट लिहिली होती जी कुणालाही दखल घ्यावी वाटली नाही म्हणून ती डिलीट केली .. .. जानेवारी 2019 मध्ये 5-जी सेवा भारतात येईल...
अशी ती कमेंट होती.

जपान आणि अमेरिकेत तंत्रज्ञान जुनं झाल्यावर ते आपल्याकडे येईल अशी आपल्याला सवयच लागली होती ना. तसं घडलेलं असल्याने उदासीनता कळू शकते पण आता डिजीटल तंत्रज्ञानाच्या युगात काहीही शक्य झालय याची प्रचिती ' जिओ ' च्या रुपात सर्व भारतीयांना येत आहे.

थोडी पुनरुक्ती होते पण लिहितो रेडिओचा शोध लागल्यानंतर जगभरात रेडिओचे पहिले दहा कोटी श्रोते होण्यासाठी 35 वर्षांचा कालावधी लागला. टेलिव्हीजनचा शोध लागला त्यानंतर दहा कोटी दर्शकांचा आकडा गाठायला या माध्यमालाही 25 वर्षे वाट बघावी लागली. मात्र 4- जी सेवा सुरु केल्यावर दहा  कोटी ग्राहकांना
 गाठायला 'जिओ' ला केवळ 167 दिवस लागले. सध्या पंचवीस  कोटी ग्राहक त्यांनी मिळविलेले  आहेत.

आपल्या हातात गतिमान असं संदेशवहन करणारी यंत्रणा आहे यानं नवी पिढी आनंदीत आहे. देशाचा विचार करताना ही आपली देशासाठीही अभिमानाचीच बाब ठरावी अशी ही संपर्कक्रांती आहे. आपण तंत्रज्ञानात अग्रेसर आहोत हे देशाने यापूर्वीच मंगळ ग्रहाच्या मोहिमेत दाखवून दिलेले आहे. यात गतिमान विकास सर्वच क्षेत्रात बघायला मिळत आहे.

जिओ फायबर हे एकाच वेळी 1100 शहरात सुरु होईल.
सध्या लॅन्डलाईन वर 2 मेगाबाईट ते 100 मेगाबाईट प्रतीसेकंद सेवा देणाऱ्या काही कंपन्या अस्तित्वात आहेत मात्र जिओ फायबरचे डाऊनलोड 1 गीगा बाईट प्रती सेकंद आणि अपलोड 100 मेगाबाईट प्रती सेकंद राहणार आहे.

जिओ फायबर सेवेमुळे पुन्हा घरात फोन दिसायला लागेल पण हा नव्या युगाचा फोन असणार आहे. या एकाच फोनला 'जिओ' राऊटर जोडून तुम्ही घरात त्याच गतीने वाय-फाय सेवा तसेच व्हिडिओ कॉलिंग आदी सोबतच इंटरनेट टिव्हीसेवा ज्यात अमेझॉन, नेटफ्लीक्स सारख्या सेवा घेऊ शकता.

याच जिओ फायबरच्या मदतीने आपल्या टिव्हीला जिओ सेट टॉप बॉक्स जोडून आपण 600 हून अधिक हाय डेफिनेशन अर्थात एच.डी. चॅनेल्ससह इतर चॅनेल्स टी. व्ही. वर बघता येतील. जिओच्या आजच्या घोषणेनंतर अनेक कंपन्यांना आता स्पर्धेत उतरणे किंवा अस्तित्व यापैकी एका लढाईची निवड करावी लागणार हे स्पष्टच आहे. कारण याची नोंदणी झाल्यानंतर एकाच वेळी 1100 शहरांमध्ये एकदम 10 लाख जोडण्यांचा मानस जिओ ने व्यक्त केलेला आहे.

मोबाईल तंत्रज्ञान आल्यानंतर बी.पी.एल. ही एक कंपनी आरंभी होती आणि रिलायन्स देखील पण ते अनील अंबानीच्या कंपनीचे बी.पी.एल. खऱ्या अर्थाने बीपीएल ठरल्यावर प्रथम हचसंन आणि नंतर व्होडाफोन
असा विलय सुरु झाला.

बिर्ला उद्योग समुहासारख्या बडया समुहाने आपली 'आयडीया' लढवली तर मित्तलांनी एअर टेल आणली जिओच्या आगमनानंतर ' आयडीया ' संपून आता व्होडाफोन मध्ये जात आहे. अनिल अंबानीची रिलायन्स बुडल्यावर ती पुर्ण पणे जिओ अर्थात मुकेश अंबानी व पुढची पिढी आकाश अंबानींच्या ताब्यात जात आहे.

दरम्यान देशात सर्वत्र उपस्थित असलेल्या भारत संचार निगम या शासकीय कंपनीला मात्र चांगली गळती लागली. प्रथम घोटाळे नंतर निर्बंध व आता निवृत्तांची वाढती संख्या यातून बीएसएनएल स्पर्धेत असली तरी केरळ व्यतिरिक्त बाहेर अद्याप 4-जी सुरु करु शकलेली नाही. या भारत संचारला जिओचा हा भारत इंडिया जोडो म्हणजे आखरी धक्का नसला तरी स्पर्धा खूपच तीव्र होणार याचा संकेत आहे.

या जिओची ही धक्कातंत्र निती केबल चालक आणि डिश टिव्ही, एअरटेलच काय पण टाटा स्काय सारख्या बडया दिग्गजांना स्पर्धेत खेचणारी ठरणार आहे
आणि त्यांची परिक्षा पाहणारीच आहे. यात फायदा अर्थातच ग्राहकांना होईल हे नक्की.

दरम्यानचा काळ मोबाईल बूमचा काळ होता. त्यात आलेल्या छोटया-छोटया श्याम टेलिकॉम, युनिनॉर, एअरसेल अशा पावसाळी छत्र्या जणू वाहूनच गेल्या. आता जिओची टक्कर टाटा स्काय आणि हॅथवे सारख्या कंपन्यांशी आहे. त्यात जिओच सरस ठरण्याची आरंभिक चिन्ह आहेत.

नील आर्मस्ट्राँग चंद्रावर उतरला. असं करणारा तो पहिला मानव ठरला. त्यावेळी जे तंत्रज्ञान आणि दोन दोन खोल्या व्यापणारे संगणक वापरले गेले.
त्या संगणकापेक्षा अधिक क्षमता असणारे मोबाईल फोन सध्या ॲपल, सॅमसंग, वन प्लस सारख्या कंपन्यानी बाजारात 500 ते 1000 डॉलरमध्ये उपलब्ध करुन दिले आहे. आणि त्या मोबाईलच्या क्षमतेत दिवसेंदिवस वाढ होताना आपणास दिसते.

माझ्या मामाचं पत्र हरवलं....... म्हणत निरागसपणे अंगणात खेळणारी पिढी आज चाळीशी पार करुन सुवर्ण महोत्सवाकडे वाटचाल करीत आहे. इतक्या मोठया प्रमाणात तंत्रज्ञानातील बदल कधी कधी गोंधळून टाकत असले तरी असे बदल अनुभवणारी ही एकमेव पिढी आहे.........आज तंत्राची गती बघताना जरा भविष्याचा वेध घ्यायचा म्हटलं तर जाणवतं की, येणारा काळ आणखी मोठे बदल घडविणारा आहे. आय टी... आय टी अर्थात माहिती तंत्रज्ञानात आज जे अभियंते कार्यरत आहेत त्यांच्यासाठी ही धोक्याची घंटा आहे.

इंटरनेट, कृत्रिम बुध्दीमता अर्थात आर्टीफिशिअल इन्टलिजन्स, तसेच
डाटा सायन्स अर्थात इन्डस्ट्री 4.2 तसेच रोबॉटिक्स, मशीन, डिजिटल मार्केटींगकडे ही वाटचाल जाते. मुलांनी करिअर मेडिकल करावं की, इन्जिनिअरिंग यात वेळ घालणाऱ्या पालकांनी वेळेत याकडे लक्ष दिलं पाहिजे.

बाजारपेठ बदलत आहे. ई-कॉमर्स वाढलय, कम्पूटर गेमिंग आता मोठया इंडस्ट्रीत रुपांतरीत झालयं त्याला दिवसेंदिवस गती येते आहे. तसं तत्रज्ञान समोर येतय. विना वाहन चालक कार आज प्रायोगिक स्वरुपात असल्या तरी लवकरच त्या अनेकांचा रोजगार संपवतील अशी स्थिती आहे.

डार्विनने सर्वोत्तम तेच टिकेल असा सिध्दांत मांडला पण तो प्राणीमात्रांच्या उत्क्रांतीसाठी होता. यात सर्वोत्तम ठरलेल्या मानवानं आता खूप उंची गाठली आहे. मानवाने तयार केलेल्या मशीन आता बुध्दीमान होत आहेत..... या उत्क्रांतीचा सिध्दांत आजवर मांडला गेलेला नाही. भविष्याच्या उदरात आणखी काय दडलय याची कल्पना नाही. मेगा ते गिगा मजल गाठणारं तंत्रज्ञान आणणाऱ्या जिओने धक्का दिला तो यावर विचार करण्यासाठीच दिला असंच म्हणावं लागेल . उद्योगाच्या जगात ' जिओ और जिने दो ' असा न्याय असत नाही. काळाची पावलं न ओळखलेल्यांच्या पाऊलखुणा देखील कधीकधी सापडत नाहीत.

माहिती तंत्रज्ञानाचा प्रसार न म्हणता विस्फोट असं जे म्हटलं जातं ते यामुळेच .... पुढे काय ची उत्सुकता लागणं वेगळ आणि त्यासाठी तयार असणं वेगळं.
जिओ च्या या नव्या प्रवासाला सर्वच जण प्रतिसाद देणार हे देखील नक्की आहे. कारण प्रत्येकाला वेगाचं वेड आहे. कदाचित वेग यायला आताच सुरुवात झालीय... Pandora's Box खुला नही है अभी......

…पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त......

- प्रशांत दैठणकर

9823199466



3 comments:

Unknown said...

Ok.
But it runs into 4G handset?

Unknown said...

Sir it's too real and you have explain it in simple words.Hats up you Sir

Prashant Anant Daithankar said...

Thanks for compliment