Monday 2 July 2018

संस्कार..... देता का संस्कार...

संस्कार ही आपल्या देशाची संस्कृती आहे असे मानले जाते. ती जगात आपल्या देशाची खरी ओळख आहे. आपल्याकडील ती 'अतिथी देवो भव' ची परंपरा असो की, एकमेकांना दिला जाणारा आदर आपण याला मानतो आणि 5 हजार वर्षांपेक्षा अधिक कालावधीपासून हे जपत आलोय. साऱ्या जगाला आपल्या देशाबाबत मोठया प्रमाणावर याबाबत कुतूहल देखील आहे.

आपण संस्कारांची चर्चा ज्यावेळी करतो त्यावेळी आपणास जाणीव असते की, संस्कार एखाद्या दुकानात किंवा मॉल मध्ये मिळत नाहीत. संस्कार ही कुटुंबात आणि मित्रांच्या संगतीत फुलणारी एक वेल असावी असं म्हणता येईल.

पालकांकडून आपले पाल्य एखाद्या अभ्यासाच्या विषयात कमजोर असेल तर शिकवणी वर्ग लावता येतात. मात्र संस्कारासाठी असे शिकवणी वर्ग देखील लावता येत नाही. मुलांना उन्हाळी किंवा दिवाळीच्या सुटीत
विविध प्रकारच्या छंद वर्गात आपण अडकवून मोकळे होतो. यात छंदाची जोपासना शक्य आहे. मात्र यातून संस्कार घडतील अशी अपेक्षा ठेवणं अतिशय चूक म्हणावं लागेल.

संस्कारी पिढी घडवण्यासाठी मुळात पालकांची पिढी संस्काराच्या वटवृक्षासारखी असली पाहिजे. सोबतच मुलं आपल्याकडे बघून अनुकरण करतात. याचीही जाणीव आपण आपल्या प्रत्येक कृतीमध्ये ठेवायला हवी. कोणताही प्राणी अनुकरणशील असतो. अशा सर्व प्राण्यांमध्ये सर्वात बुध्दीमान प्रजाती म्हणजे मनुष्यप्राणी आहे, असे आपण मान्य केलेले आहे.
मानव प्राण्याच्या जाणीवा विकसित झालेल्या आहेत. आपण सहजीवनात विश्वास ठेवतो. हत्तींचा कळप आणि मानवी समाज यात मुळात फरक हा आहे की, आपण एकमेकांप्रती आदर ठेवतो.

वडिलधाऱ्या व्यक्तीकडून संस्कार घडवण्याची गरज नसते ते दैनंदिन वागण्या-बोलण्यातून घडत असतात. ही अगदीच सहजपणे होणारी प्रक्रिया आहे. त्यासाठी मुलांना हवी असते ती जवळीक आणि सोबतच भावनिक मोकळीक यांची.

सर्वसाधारणपणाणे मुलांना द्यायला वेळ नाही. मग यातून त्यांना गुंतवून ठेवणे हा एक मार्ग शोधला जाताना दिसतो. पूर्वी अशी चौकोनी कुटुंब पध्दती नव्हती.
अशा काळामध्ये घरात माणसांचा राबता असायचा. त्यामुळे कुणातरी एकाचे लक्ष सातत्याने असायचे. यातून जपला जाणारा स्नेहभाव आणि जिव्हाळा याची तुलना आजच्या चौकोनी कुटुंबात होवू शकत नाही.

यात संस्कार हे आपोआप घडतात, असं मान्यच केलं पाहिजे. आजकल तर एकूलता एक ही प्रवृत्ती वाढीस लागली आहे. 15 ते 20 लाखांचे पॅकेज घेणाऱ्या आय.टी.क्षेत्रीतील पती - पत्नीला पॅकेजची चिंता अधिक असल्याने मूल दत्तक घेताना आपण बघतो की, समाजात ज्यांचे कुणीच नाही अशा मुलांना दत्तक घेणे केव्हाही चांगलेच म्हणावे लागेल.

मुलाचे हट्ट पुरवण्यासाठी सर्व गोष्टी दुकानात आणि आता तर ऑनलाईन उपलब्ध आहेत. मात्र संस्कारांचे काय? संस्कार ना दुकानात मिळतात ना ते ऑनलाईन उपलब्ध असतात. संस्कार हे जाणीवेतून घडतात पण आपल्या अपूर्ण अपेक्षांचे Extension म्हणून मुलाचा वापर करताना याचा आपणास विसर पडतो. आपल्याला डॉक्टर व्हायची इच्छा होती पण ते जमलं नाही, म्हणून मुलांच्या विश्वावर आपण आपलं स्वप्न लादून मोकळे होतो आणि मोठी गल्लत होते.

काळ बदलत आहे आणि आपण काळाची पावलं ओळखली पाहिजे कारण ती ओळखली नाही तर आपली भावी पिढी भरकटणार याची आपणास जाणीव आपण ठेवावीच लागेल. काळाचा बदलाचा वेग खूप अधिक आहे त्यानुरुप आपण याचा वेध घेऊन आपणच नव्या पिढीला मार्गदर्शन करायला पाहिजे.

राजकारणात
ज्याप्रमाणे घराणेशाही आपण बघतो तीच घराणेशाही समाजात व्यवसायाच्या बाबतीत आपणास दिसते. संस्कारक्षम वयात मूलं कच्चा मातीचा गोळा असावं अशी असतात. त्यांना संस्कारातूनच घडवायचं असतं हे सूत्र आपण जाणलं पाहिजे. तसे संस्कार आणि आदर्श त्यांच्यासमोर ठेवले पाहिजेत. यातून व्यक्तीमत्व खुलतं उमलतं... वाढ योग्य झाली नाही तर झाडं जशी खुरटतात तसं व्यक्तीमत्वाचंही हेातं, याची जाण आपण ठेवायला हवी.

संस्कार देता का संस्कार.......कुणी माझ्या चिमुकल्या जिवांसाठी संस्कार देतं का ........असं म्हणून संस्कार मिळत नाहीत. कारण आजवर जगात साऱ्या वस्तू जगात विकत मिळत असल्या तरी विचार, व्यक्तीमत्व आणि संस्कार कोणत्याही दुकानात मिळत नाही.

प्रशांत दैठणकर
9823199466

1 comment:

Unknown said...

संस्काराबाबत उत्तम लिहिले आहे ,अप्रतिम