Wednesday 25 July 2018

पाठलाग स्वप्नांचा...!

स्वप्नं. . . कधी ना कळणारी . . कधी गुंतवणारी , अधिकतर पहाटे -पहाटे प्राजक्त फुलांवर पडलेल्या दवबिंदुंसारखी . . . स्वप्नांच्या ओझ्यानं फूलं टपाटप खाली पडायला लागतात अन् सूर्याच्या आगमनानंतर पहिल्याच त्या कोवळ्या किरणांच्या धगीने ( ? ) हवेत विरुन जातात . .!

स्वप्नात पाहिले कधी काही आठवावं म्हटल तर ते आठवत नाही . . . वास्तवात पोळणाऱ्या मनाला ती स्वप्न . . ती गुलाबी स्वप्ने जगण्याची उभारी देत असतात. . . दिवस रुक्ष वास्तवाचा असला तरी रात्र मात्र त्या रंगीन स्वप्नांची असते . . ! प्रत्येकाची स्वत:ची खास अशी स्वप्नांची सृष्टी अर्थात सपनोंकी दुनिया असते.

. . दिवसा देखील स्वप्न बघितली
जातात उघडया डोळयांनी पण तिथं हिमंत कधी-कधी होत नाही . . बोलायला जीभ कचरते . . खूप सारं ओझं त्या जिभेवर असावं अशी ती जड होते . . पण सुरु झालेलं ते स्वप्न रात्रीच्या अंधारात पापण्यांच्या पडद्याआड सारे औपचारिकतेचे आडपडदे ओलांडून बोलकं होतं . . दिवसा न रेटणारी जीभ गाणी गायला लागते . . . दिवसा तिच्यासमोर हिमंत नसली तरी ती सपनोंकी रानी त्याच्यासोबत नृत्य करते . . गाणी म्हणते . . . स्वप्नात . . दिवसा मात्र.... याचं फक्त स्वप्न . . . सारं कसं स्वप्नवत स्वप्नांची कहाणी तिच्याविणा अधुरी राहत नाही . . पण ती पूरीही होत नाही . . . कम्बख्त बिचमें यह सुबह हो जाती है . .

स्वप्नातला तिचा तो राजकुमार . . त्या प्रत्येकीच्या मनात असतो . . तो नुसता राजकुमार नसतो तो खऱ्या अर्थांन सपनों का सौदागर असतो . . त्या राजबिंडया रुपाचं स्वप्न उशाशी घेऊन रोज रात्री झोपते त्यावेळी मनापासून प्रार्थना करीत असते की आयुष्यातही तोच राजकुमार आपला जोडीदार असावा . .
. स्वप्न पहाट वाऱ्यात विरुन जातं . . वास्तव्यानं जाग आल्यावर आपल्या आयुष्यात काय ' खेळ मांडियेला ' याचा बोध होतो . . . . तो कसाही असला तरी आयुर्विम्याप्रमाणे त्यालाही पर्याय नाही म्हणत स्विकारावं लागतं . . . समाधान इतकंच की दिवसभराच्या थकल्या धावपळीनंतर . . . आवांछित स्पर्शानं किळस येवूनही अगदी टाळता येत नाही असा देहात्कार संपवून डोळे मिटतात त्यावेळी पापण्यांच्या त्या पडद्यावर तोच राजबिंडा राजपूत्र कवेत घेण्यासाठी दोन हात पसरुन उभा असतो .

. . . उशाशी असणारं तारुण्यातलं ते स्वप्न आता कारुण्यात उराशी आलेलं असतं . . . त्याला कवटाळून या कंटाळवाण्या इहलोकाची यात्रा सुरु राहते . . आधार फक्त त्या स्वप्नांचा .

त्याचं फारसं वेगळं नाही . . . फुलोंके शहर में है घर अपना . .
.
असा सपना . तो बघतो पण आयुष्य कंठावं लागतं ते वनरुम किचन च्या त्या किचकिचाटात... अर्थांत त्यातही समाधान असं की आपण 'हायर मिडल' वाले.. धारावीत रहायला लागलं नाही म्हणजे आपण सुखी..!

सुख शोधताना आपण आपल्यापेक्षा खालच्या दर्जाच्या व्यक्तीकडे बघावं ... त्याचं जगणं किती कष्टप्रद आहे ते बघावे म्हणजे आपण किती सुखी आहेात याचा बोध होतो... आपल्यापेक्षा अधिक पत व संपत्ती असणाऱ्याकडे बघणं क्लेशदायक पण जगणं ज्याला कळलय त्याच्या दृष्टीने त्या आयुष्याची आसुया न बाळगता त्याच्या सारखं जगता यावं ..! हे स्वप्न हा झाला सकारात्मक पणा.

साधी एक चार फुटांवरुन उडी मारता येत नाही
दिवसा पण स्वप्नात आपण त्या सूपरमॅन ला मात देतो विश्वामित्राने स्वतंत्र सृष्टी निर्माण करायचा प्रयत्न केला त्यातील त्रिशंकू आठवावा …पण ही स्वप्नं आपल्या मनातली प्रतिसृष्टी असते... त्या सृष्टीतील ब्रहमा आपण.. विष्णू आपण.. विश्वकर्मा आपण आणि शिव देखील आपण ... आपल्या सृष्टीतील आपणच सर्वेसर्वा ..केवळ जाग येईपर्यंत.

स्वप्नं ...म्हणजे आपल्या अंतर्मनाचा आवाज असतो... जे आपण जगावं असावं असं आपल्याला वाटतं पण वास्तवात शक्य होत नाही ... ते स्वप्नात होतं...!
माझ्या मनाची कोलाहलातली स्थिती मला जगू देत नाही पण माझी स्वप्न मला मरु देत नाही ... मी कितीही निराश झालो तरी मला कळतं की आपलं निम्म आयुष्य झोपण्यात अर्थांत .... स्वप्नात जाणार आहे आणि त्या स्वप्नांच्या सृष्टीचा राजा होता येतं.. मग जगणं का सोडायचं.. .

हातातलं पुस्तक जड व्हायला लागतं ... पापण्यांची दार बंद व्हायला लागतात ... अखेर तिसऱ्या घंटेला पापण्या मिटून ... एक रंगमंच खुला होतो. रंगीत चित्र दिसायला लागतात तिथं मी अबोल नसतो .. तिथं कार्यालयाच्या कोपऱ्यात बसून कॉम्प्यूटर च्या किबोर्डवर बोटं बडवणारा क्लर्क नसतो... तिथं त्या जगात मी सेंटर स्टेजला... 

पण हाय, तिथं ही ...

घर देता का घर
कुणी या तुफानाला
घर देता का घर ..?

अरे यार या महानगरीत स्वप्नं देखील अशी पडावीत..! 
आयुष्य म्हणजे दोन श्वासातलं अंतर असं म्हणतात पण माझं विचाराल तर ते दोन स्वप्नातलं अंतर असतं... पुन्हा स्वप्न पहाण्यासाठी दिवसभर कष्टांची तमा न बाळगता मी धावत राहतो... माझा हा दोन स्वप्नातला प्रवास स्वप्नवत वाटला तरी मला कळतं...
ज्या दिवशी डोळे मिटल्यावर स्वप्न दिसणार नाहीत तो स्वप्नांचा नव्हे तर माझा अंत असेल........ माझा अंत असेल... ..
.मी खडबडून जागा होतो...!


प्रशांत अनंत दैठणकर

9823199466 


3 comments:

Unknown said...

Real fact boss !!

Anonymous said...

Ooooo"""' cooollllll,,


Unknown said...

अगदी खरं आहे.