Saturday 28 July 2018

...तुझा अबोला..!

बोलता बोलता शब्दांनी दुखावलं गेलेलं मन मग अबोला धरतं..

हा रुसवा सोड सखे

पुरे हा बहाणा.. सोडना अबोला..! 

 हा एक प्रकारचा असहकार असतो त्या नात्यामधला... सतत बोलणारी व्यक्ती अबोल झाली तर करमत नाही मनाला.. कुठतरी मनात वेदना जाणवायला लागते... नांत कोणतही असलं तरी त्यात निषेधाचा हा मार्ग साऱ्यांना खुला असतो. आता हाच अबोला धरण्याची सवय आपणास अगदी बालपणासून जडते...आम्ही नाही जा.. म्हणत लहान मुलं 'कट्टी' करतात पण ती खूप निष्पाप असतात त्यांची ही कट्टी अल्पावधीत संपून जाते.. बोलत राहणं ... संवाद साधणं हा मानवाचा मुळ स्वभाव आहे.

वय जसं वाढतं तसं भावना बदलाला सुरुवात होते...

मोरा पिया मोसे बोलत नाही...


असं एक छानस गाणं मधल्या काळात आलं होतं.

जितेंद्र रेखा यांचा एक चित्रपट माझ्या लहानपणी पाहिला होता.
'एक ही भूल' हा तो सिनेमा .. पती-पत्नीतील ही अनबन सतत सुरु राहिली तर प्रकरण भलत्या स्तराला जाऊ शकतं याची जाणीव दोघांना असली पाहिजे. पती-पत्नीच्या नात्याला संशयाचं जाळं लागलं तर बाब खूप बिघडते यात 'सुलह' कराने वाला अर्थात मध्यस्त असेल तर तोडगा सहजपणे निघू शकतो मात्र ते दोघेही इरेस पेटले तर मात्र काडीमोड हा अंतिम उपाय असतो.  अशाप्रकारे अनेक संसार तुटल्याची उदाहरणे आपल्या आसपास आपणास दिसतात.
याला काडीमोड हाच शब्द योग्य आहे कारण घटस्फोट हा शब्द केवळ आणि केवळ अंतिम संस्कारच्या वेळच्या कृतीसाठी वापरतात पण आजकाल मराठीचं तंत्र बिघडलं आहे आणि कोणीही कोणताही शब्द कोठेही वापरताना दिसत आहे. मन खंबीर होतं त्यासोबतच ते अधिक हट्टी होत असतं.. ते हट्टी झाल्यावर हा कट्टीचा काळ वाढतो आणि लवकर लवकर गट्टी जमणं बंद होवून जातं ......नातं कोणतं आहे त्यावर मग हा अबोला धरण्याचा कालावधी ठरत जातो ... पती-पत्नी यांच्या नात्यात असणारा आपलेपणा
आणि जवळीक खुपच वेगळी असते मात्र या नात्यात देखील या अबोल्याचा वापर शस्त्राप्रमाणे होताना दिसतो.. यात दोघांपैकी कुणी माघार घ्यायची असा अहं आडवा आलं तर प्रकरण थेट संबंध संपण्यापर्यंत बाब वाढते.

मौनम सर्वार्थ साधनम् ! 

असं एक वचन आहे.. आपण मौन पाळलं तर आत्मपरिक्षणास सुरुवात होते..  न बोलणे आपल्या आयुष्यात सकारात्मक देखील असू शकते.. याचा उत्तम वापर झाला तर त्यातून आपली क्रियाशिलता वाढते... सर्वच धर्मात 'मौन' किती महत्वाचे आहे.. अर्थात मौन म्हणजे अबोला नव्हे   मौनाचं आध्यात्मिक महत्व खूप आहे.. आपण ज्याला ध्यान लावणे म्हणतो.. आता याचीही गंमत आहे.. आपण 'ध्यान' स्विकारलं नाही पण हेच ध्यान बौध्द धर्माच्या प्रसारात जपानपर्यंत पोहोचलं तिथं त्याचं रुपांतर 'झेन' मध्ये झालं आणि हेच झेन भारतात आलं तेव्हा त्याचं आम्ही त्याचं कोणकौतूक केलं...!

विषय अबोल्यावर सुरु झाला पण त्याची दुसरी बाजू देखील तितकीच महत्वाची आहे. अबोला धरल्यावर दोघांनाही करमत नाही अशा वेळी दोघांनाही आत्मचिंतन करायला वेळ मिळतेा... दोघांपैकी चूक कोणाची आहे.याबाबत चितंन होतं.... मला विचाराल तर हा अबोला देखील खूप महत्वाचा
आहे...
 शब्दाला शब्द लावून भांडण करण्यापेक्षा अबोल राहणं खूप चागलं... भांडणाच्या भरात भावना दुखावल्या की ते नात संपतं त्यामुळे अबोल्याचा हा 'पाॅझ ' नातं मजबूत करण्यासाठी अधिक महत्वाचा आहे.




कभी कभी दूरी भी जरुरी है

प्रेमीयों मे प्यार बढाने के वास्ते..!


जीवनात सर्व प्रकारे नवरसांचा अंतर्भाव नसेल तर जगणं निरस होवून जाईल ...

मराठीत म्हणींची कमतरता नाही प्रत्येक स्थितीला साजेशी म्हण आपल्याकडे आहे.

शहाण्याला शब्दांचा मार.

अशी एक म्हण आहे पण शब्दानं मारणं हा उपाय नाही. कधी कधी शब्दांचे बाण जिव्हारी लागतात आणि नांत कायमचं तुटतं.. त्यापेक्षा अबोला केंव्हाही परवडला . पती-पत्नी हे नातं लग्नगाठीनं बांधलेल असतं आणि याला रेशीमगाठी म्हणतात त्यामागेही कारण आहे असं मला वाटतं.. रेशमाची गाठ कितीही घट्ट बसली तरी ती अगदीच वेळ आल्यास सोडवता येते....सुताच्या गाठीला तोडण्याशिवाय पर्याय राहत नाही...!   कोणतही नांत जुळतं त्यावेळी त्यावर 'एक्सपायरी डेट' नसते...! आपणही ती टाकायचा प्रयत्न करू नये असं माझं मत आहे.

नातं कधी ओझं वाटायला लागलं तर ते काही काळ उतरवून ठेवायचं... नात्याचं सिंहावलोकन करायचं ... थेाडयाशा पॉझनंतर ते पुन्हा हवंहवसं वाटायला लागतं ...


नात्यांमध्ये हा लटका राग, खरा गुस्सा , अबोलारुपी असहकार त्यामुळेच आवश्यक ठरतात..या ऋणानुबंधांच्या गाठीत असला रुसवा आणि अबोला त्यासाठीच आवश्यक वाटतो.



प्रशांत अनंत दैठणकर
9823199466

Lighter Side: - या अबोल्याचा स्वीकार इतका झाला आहे की आपल्याकडे अबोलीचं फूल (कसं बुवा..?)आहे आणि अबोल रंग (...हे अनाकलनीय आहे) देखील आहे...

No comments: