Tuesday, 19 July 2011

ती कुत्र्याची छत्री !

            पावसाचं आणि माणसाचं नातं खूप वेगवेगळं आहे. हल्ली मात्र त्यात बदल होताना दिसतोय. लहानपणीचा पाऊस आज पुन्हा लहान होवून झेलावा असं वाटतं. पडणा-या पावसाचे थेंब आणि त्यांनी तयार केलेलं तळं तासनतास पहावं आणि पाऊस पडायचा देखील तितका मोकळेपणानं.
     पावसाळा आला की पहिले ठेवून दिलेल्या छत्रीचा शोध सुरु व्हायचा. काळ्या कपड्याची ती छत्री सर्वांची आवडती. छत्री `स्टॅग` कंपनीचीच असावी असा आग्रह. छत्रीवर नावं लिहायची पध्दत आणि ती कशी खटकन उघडते याचं बालमनाला कौतूक वाटायचं. खराब झालेली छत्री दुरुस्त करणारे छत्रीचे कारगिरही भरपूर असायचे.
     स्टॅगचा काळ जाऊन आता स्मृतीत साठलाय छत्रीचं त्यावेळचं कौतूक न्यारं होतं. आता छत्र्यांची जागा रेनकोटनं आणि जॅकेट्सने घेतली. आणि फोल्डींगच्या छत्र्या आल्या अर्थात मुंबईत छत्रीचा वापर आज होत असला तरी तितका पाऊस औरंगाबादेत होत नसल्याने छत्रीचा वापरही अभावानेच होतो.
     पावसाळ्यात जशी छत्रीची मजा तशीच ती कुत्र्यांच्या छत्रींची देखील होती. अंगणात उगवणारी ती बुरशीजन्य अळींबी म्हणजे कुत्र्याची छत्री. आता त्यावेळचा प्रश्न आज परसदारी फोटो काढताना पुन्हा मनात डोकावला की याला कुत्र्याची छत्री का बरं म्हणत असतील ?  कुत्र्यांचा याच्याशी नेमका संबंध तो कोणता ? बर ही कुत्रा कशी धरत असेल... त्याला तर हातच नसतात.. इतकी छोटी छत्री धरलीच तरी तो भिजणारच ना... एक ना अनेक सवाल..
            अशा छत्र्या अंगणात दिसल्या की मग आमचा खेळ सुरु. खाली वाकून त्या छत्रीचं ते निराळं सौंदर्य निरखायचं आणि त्यातल्या जाळीत बघत त्याकाळी असलेल्या अल्प ज्ञानाने त्यावर चर्चा करायची.
     वाडे गेले अंगणही गेले. मोठी अपार्टमेंट्स आली. पार्कींग मध्ये चिखल नको म्हणून माती सिमेंटने झाकली त्यामुळे आता ही छत्री दिसणं सोपं नाही. माझ्या वर्धेच्या बंगल्यात मात्र खूप मोठं अंगण आणि पावसापाठोपाठ कुत्र्याच्या छत्र्या आल्या. वेदांतला ती छत्री दाखवली आणि त्यांनं मला प्रश्न केला ` बाबा याला कुत्र्याची छत्री का म्हणतात ?  अर्थात माझ्याकडे उत्तर नव्हतं.
     आयुष्य असंच.. सवयीनं आपण जगतो, वागतो अनेक वस्तू हाताळतो बोलतो. काही प्रश्नांची उकल मात्र कधीच होत नाही तसाच एक निरुपद्रवी प्रश्न म्हणजे ती कुत्र्याची छत्री !

                                -प्रशांत दैठणकर
                           000000


No comments: