Thursday 21 July 2011

रवीवार... १९७७ सालचा


रविवारची ती सकाळ, सन १९७७. शहर औरंगाबाद. त्या काळी गाव खूप छोटंसं होतं. शहराची ओळख असणा-या गुलमंडीतून सिटी बस जायची असं आजच्या पिढीतील मुलांना सांगितलं तर त्यांना ते खरं वाटणार नाही. शहरात त्यावेळी सकाळ आणि संध्याकाळ असं दोन वेळ नळाला पाणी यायचं याचा आजकालच्या पिढीतील गृहीणींना सांगितलं तर त्यांना त्याचा हेवा वाटेल असा तो काळ. माझं वय सात ते आठ वर्षाचं. आठवणी ताज्या आजही....
      त्या काळात रेल्वे स्टेशनला जायचं हा खूप मोठा सोहळा होता माझ्या बालमनासाठी. टॉक..टॉक करीत ऐटीत चालणारा घोडा जुंपलेला तो टांगा. त्या टांगेवाल्याचं थाटात मोलभाव करणं. टांग्याची मजाच आगळी होती. त्या टांगेवाल्याच्या बाजूला बसण्याची धडपड असायची. उगाच घाबरत घाबरत त्या घोड्याला हात लावून पाहणं आणि टांगेवाल्याची नजर चुकवून हळूच लगामाला हात लावणं याचं थ्रिल त्या वयात डोक्यात होतं.
      रहायचं ठिकाण, दलालवाडी. शहराचा मुख्य मार्ग असणा-या टिळक पथाजवळील एक गल्ली. बाजूने वाहणारा एक मोठा नाला. नाल्याच्या पलीकडील बाजूला दोन मजली इमारत अर्थात माझी नगर पालिकेची शाळा. त्या शाळेच्या माडीवरून घर दिसायचं. दुस-या बाजूला नाला पार केल्यावर जाफरगेट भागातील आठवडी बाजाराकडे जाणारा रस्ता. आईचा हात धरून नाला पार करीत दर रविवारी भाजी आणायला जाताना गंमत वाटायची. आयुष्याला खास असा संथपणा असलेला तो काळ. आजच्या सारखी धावपळ नव्हती त्यावेळी. भाजी बाजारात जाताना कोप-यावर एक चुन्याची भट्टी होती. त्यात चुन्याने भरलेला हौद होता. इथं उगाच थांबून हा चुना नेमका कसा बनवतात हे कुतूहल मनात घेऊन मी बराच वेळ रेंगाळायचो.. आजही मन अचानक त्या भट्टीजवळ रेंगाळताना मला जाणवतं.
      रंगांची विविधता त्या काळी फारशी नव्हती. औरंगाबाद हे पांढ-या रंगाच्या भिंतींचं आणि हिरव्या ब निळ्या दारांचं साधंभोळं गाव होतं. भिंतीला टेकून बसल्यावर हमखास कपड्यांवर पांढरा रंग चढायचा. दिवाळी आली की आईची लगबग सुरू व्हायची. घरात सामान मध्यभागी जमवायचं. चुन्याच्या त्या भट्टीवरून बादलीत चुना आणायचा. रंग देण्यासाठी कारागिर वगैरे प्रकार नसायचा.. अर्थात ते परवडणारं देखील नसायचं. आईच कमरेला पदर खोचून रंग देण्याचं काम करायची. वडील माझे नाना नोकरीसाठी बाहेर दौ-यावर असल्यानं आईच सारी कामे करीत असे.
      एका लाकडी काठीला जुना कपडा गुंडाळला की झाला ब्रश तयार. आईला मदत करण्याच्या नावाखाली आपणही एक छोटा कपड्याचा तुकडा घेउन छोटा रंगकर्मी होत केलेली लुडबूड ती कौतुकानं सांभाळून घ्यायची. अख्ख अंग चुन्यानं पांढरंधोप करून घ्यायचं. किटण चढलेली कढई खरवडून साफ करावी तसं मग आई मला स्वच्छ आंघोळ घालत असे. तो गार पाण्याचा शिपका आणि ती धुलाई अगदी कालच झाली इतकी मनात ताजी आहे.
      ज्या ठिकाणी रहायचो तो नागापूरकरांचा वाडा एक मिनी चाळच होता. साधारण दहा बि-हाडं तिथं रहायची. त्या प्रत्येकाचा कोण वेगळा. काही चौकोनी काही षटकोनी तर काही अष्टकोनी. सकाळी पाणी भरताना काही शाब्दीक वादाचे प्रसंग घडले तरी सायंकाळी घरात केलेल्या भाज्यांची देवाण- घेवाण करताना एक प्रेमळ कौटुंबिक जिव्हाळा दिसायचा. दिवाळीत सारं रंगाचं काम सा-या घरात जवळपास एकाचवेळी चालायचं. त्या दिवशी शेजारच्या घरातून चहाच नव्हे तर जेवणही यायचं.
      आज मागं वळून बघताना ते सारे आता कुठे आहेत हा विचार मनात येतो. आपला हात धरून जगायला शिकविणारे माय बाप असतात, शेजारीही प्रेमळ नजरेने देखभाल कराय़चे. टोकायचे, रागवायचे पण त्यात आपलेपणा होता. आता झोप मोडते म्हणून भांडणारे आणि मुलांना अपार्टमेंटच्या पार्कींगच्या जागेतही खेळू न देणारे शेजारी बघून त्या शेजा-यांची किव करावी वाटते... खरच आपण इतकं सुंदर आयुष्य जगलो याचा आनंदही होतो...
प्रशांत दैठणकर

No comments: