Saturday 7 July 2018

5.81 लाख कोटी रुपयांचा .. फेसबूकचा झुकरबर्ग

जनसामान्यांना मिळालेलं ते डिजीटल स्वरुपातलं व्यासपीठ आहे, हो व्यासपीठच आहे. प्रत्येक व्यक्तीचं स्वत:चं असं एक विश्व असतं आणि ती व्यक्ती त्या विश्वाच्या केंद्रस्थानी असतं. व्यक्तीच्या अंतरंगात सतत विचार सुरु असतात, कुणाच्या अंगी काही उपजत गुण असतात आणि प्रत्येकाला ते व्यक्त करण्याची संधी हवी असतं. अशी संधी अगदी अपघातानं गवसलेल्या मार्क झुकरबर्ग ने फेसबूक दिलं..... लोकांना लिहितं केलं तो मार्क याच फेसबुकच्या बळावर वॉरन बफे ला मागे टाकत जगातील तिसऱ्या क्रमांकाचा श्रीमंत बनलाय.
प्रत्येकातला लेखक जागवणं फेसबूकनं केलं आणि त्या माध्यमातून कोट्ट्यवधी लोकांनी आपलं आयुष्य काही प्रमाणात सार्वजनिक करायला सुरुवात केली. हे सारं घडतय जागतिक लेखन दिनाच्या पुर्वसंध्येस.

हो 8 जुलै हा जागतिक लेखन दिवस. या दिवसानिमित्त मी 2011 साली अर्थात 7 वर्षापुर्वी लेख लिहिला, ब्लॉग लिहिला होता. त्याची आठवण जागी करत पुन्हा लिहायला घेतलय.....त्या ब्लॉगमध्ये मी फक्त लेखनाचा इतिहास मांडायचा प्रयत्न केला आता याचं वर्तमान आणि जमलं तर भविष्याचा वेध घेण्यासाठी हा लेखन प्रपंच.

फेसबूक शिवाय दिवस जात नाही अशा नव्या पिढीचा हा काळ आहे.
फेसबुकच्या वापरात भारत जगात पहिल्या क्रमांकावर आहे. (चला खेळात नाही तर इथं नाव कमावलंय) ..... भारतात आजच्या उपलब्ध ताज्या आकडेवारीनुसार 27 कोटी लोक फेसबुक वापरत आहेत. दुसऱ्या स्थानी याचं जन्मस्थान अर्थात अमेरिका असून 24 कोटी अमेरिकन फसबूक वापरतात. (त्यातले पुन्हा तिथं वसलेले भारतीय किती ? )...... तिसऱ्या क्रमांकावर इंडोनेशिया 14 कोटी आणि त्यानंतर 13 कोटी ब्राझील अशी क्रमवारी आहे.

जगभरात एकूण लोकसंख्येपैकी 219 कोटी लोक फेसबूक वापरतात. फेसबूक जन्माला आलं ते 4 फेब्रुवारी 2004 रोजी. झुकरबर्गने हे केवळ विद्यापीठांतर्गत वापरासाठी बनवलेलं नेटवर्क होतं. हार्वड विद्यापीठांतर्गत याला मिळालेला प्रतिसाद पाहून अमेरिकेच्या इतर विद्यापीठात ते वापरता येईल अशी व्यवस्था 2006 मध्ये केले.

जशी याची लोकप्रियता वाढीला लागली तसा त्याचा विस्तार जगात क्रमाक्रमाने वाढत गेला. 2012 साली फेसबुकनं 100 कोटींचा टप्पा गाठला...... एव्हाना त्याला विकसित रुप प्रदान झालं होतं. आणि ते उत्पन्नाचे साधनही बनलं होत.
या सुमारास इतर भाष्यांचा समावेश तंत्रज्ञानाने शक्य केला. त्यानंतर फेसबुकची कोटी च्या कोटी उड्डाने सुरु आहेत. आज फेसबूक जगातील 140 भाषांमध्ये वापरलं जात आहे. याबाबत मायक्रोसॉफ्टशी हातमिळवणी फेसबुकच्या पथ्यावर पडली.

गेल्या 14 वर्षात विस्तार करताना फेसबूकने मेसेंजर, इन्स्टाग्राम आणि व्हॉटसॲप सारखी सोशल माध्यमे त्यासोबत आपल्या कंपनीत जोडली.

स्मार्ट फोन आणि 4 जीचा प्रसार झाल्यानंतर याची वाढ अधिक झपाटयानं झाली. सर्वाधिक उल्लेखनीय बाब म्हणजे फेसबुकच्या भारतातील वापर कर्त्यांपैकी आघाडीवर असणारे राज्य....
अर्थातच महाराष्ट्र राज्य आहे. (माझा मराठीचा टक्का 'बरकरार' आहे )...... महाराष्ट्रात अडीच कोटींहून अधिक फेसबूक वापरणारे आहेत.

आजच्या पिढीत याची सर्वाधिक क्रेझ दिसून येते. भारतात साधारण 85 टक्के वापरकर्ते हे 13 ते 35 या वयोगटातले आहेत.

माझ्या दृष्टीने आकडेवारी महत्वाची नाही फारशी. महत्वाचं आहे ते लिहिणं,

समर्थ रामदास स्वामी सांगून गेले आहेत.

दिसामाजी काहीतरी लिहित जावे......

आता या लिखाणाला सुरुवातीला काही धरबंध नव्हता आणि त्यामुळे अनेकदा मारामारी, दंगल असे प्रकार भारतात घडलेले आहे. पण आता फेसबुकने यावर काही निर्बंध आणले आहेत.... काय नाकारायचं आणि काय स्विकारायचं याचा अधिकार अबाधित ठेवत त्याची अंमलबजावणी करीत आहे.

दुसऱ्या बाजूला लिहिणारे देखील लवकर प्रगल्भ होत आहेत असंही चित्र आहे. त्यात मैत्री नाकारणे किंवा एखाद्याला प्रतिबंध करणे अशा सुविधांनी आता फेसबूक देखील ' सेफ ' बनत आहे. दिवसागणिक यात नवनविन बदल येत आहेत.

' मला स्वप्न देखील मराठीत पडतात ' असं नाना पाटेकरचं वाक्य मला आवडतं.....आपल्या भावना व्यक्त करायला मातृभाषेत कधीच मर्यादा येत नाहीत. आणि त्यामुळे अनेक नवे लेखक, कवी समोर येत आहेत.

साहित्य ही विशिष्ट वर्गाची मक्तेदारी आहे.
त्यांना पटलं तरच तुमचं लिखाण प्रसिध्द होईल असा काळ फेसबूकनं इतिहासजमा करुन मराठी साहित्यासाठीही मोठा इतिहास घडवलाय असं मला वाटतं. या फेसबुकवर कला-क्रीडा-साहित्य मनोरंजन यांचा रतिब आपणास बघायला मिळतो याला मी अभिव्यक्तीची ' त्सुनामी ' असं म्हणतो.

नाण्याच्या दोन बाजू त्यामुळे फेसबुकचा वापर करुन गुन्हे घडवणारेही इथं आहेत..... चोर हो.... भागोगे तो पकड लुंगा म्हणत अशांना पकडण्यास महाराष्ट्रात सायबर  सज्ज आहे. पण आपणही व्यक्तीगत सुरक्षा कुंपण घातलं पाहिजे म्हणजे फसवले जाण्याची शक्यता उरत नाही.

फेसबुकच्या रुपाने वाड:मय चोर देखील सरसावले आहेत. त्यामुळे लिखाण करणाऱ्यांना जरा चिंता आहे... पण यामुळे लिखाण थांबलं नाही पाहिजे.

फेसबुकनं काय दिलं हे बघताना मार्क झुकरबर्गला 14 वर्षांच्या त्याच्या तपस्येचं फळ काय मिळालं तर ती त्याची न मोजता येईल इतकी संपत्ती आहे.
शुक्रवारी 6 जून रोजी फेसबुकचा शेअर 203.23 अमेरिकन डॉलर प्रति शेअर थांबला (भारतीय चलन 13975.11 रुपये ) फेसबुकचा निर्माता मार्क झुकरबर्ग यांच्या मालकीचे अर्थात स्वत: नावे शेअर्स आहेत. तब्बल 41 कोटी 61 लाख 45 हजार 32.....! (सारं कोर्टीतच ना.....!)

मार्कनं बर्कशायर हॅथवे कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी वॉरेन बफेला मागे टाकलं. आज मार्कच्या संपत्तीचं मुल्य आहे 81.6 बिलीयन डॉलर्स अर्थात 5.81 लाख कोटी रुपये आता हे लाख..कोटी म्हणजे किती शुन्य..... सहज पडलेला प्रश्न.... कारण भारतानं जगाला 'शुन्य ' दिलय ना...!

बॉरन बर्फ पेक्षा मार्कची संपत्ती 2,565 कोटींनी अधिक झाली आहे. अर्थात वॉरन बफें जितका उत्तम गुंतवणूकदार आहे तितकाच तो दानशूर ही आहे. त्याने तीन महिन्यापुर्वी 290 दशलक्ष डॉलर दान म्हणून दिल्यानं बफेची संपत्ती काहीशी घटली आहे. आता ही दानाची रक्कम भारतीय चलनात केवळ 3.44 लाख कोटी फक्त इतकी आहे. हे सांगायलाच पाहिजे
(.... आम्हाला दानवीर म्हणून कर्ण एकटाच माहिती....! आणि आम्ही रक्तदान करतो तेंव्हा स्वत:ला कर्णापेक्षाही श्रेष्ठ समजायला लागते ते वेगळं)

आम्ही लेखक.... सारस्वत हो.... सरस्वती आणि लक्ष्मीचं जमलय काय कधी... जिथं सरस्वती बसते तेथे लक्ष्मीचा निवास नसतो..... हे म्हणजे लेखक मानधनात अन मानपानात खूश आणि प्रकाशक अन वितरक विमानात खूश असं काहिसं गणित.

असू देत... आपण लिहितोय.... व्यक्त होतोय याचं समाधान तो लाखो कोटी रुपयांपेक्षा अधिक मानतो आम्ही..... एक लाईक म्हणजे एक मिलियन आणि 10 कॉमेंट म्हणजे एक बिलीयनचा आनंद देतो......

त्यामुळे .... लिखते रहो....!

- प्रशांत दैठणकर

9823199466



4 comments:

Mangesh Warkad said...

Very nice, informativr

Ritesh Bhuyar said...

सुरेख झालाय सर लेख.उत्तम लेखनशैली आणि छान खुलवलेली आकडेवारी यामुळे भारदस्त झालिये ही पोस्ट.मनापासून अभिनंदन सर.💐

Prashant Anant Daithankar said...

Thanks mangesh
.. lots of thanks

Prashant Anant Daithankar said...

Ritesh
Thanks buddy